महागाईत सेवाकराचा ‘भडका’
By Admin | Updated: May 25, 2016 00:02 IST2016-05-24T23:57:20+5:302016-05-25T00:02:12+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद पाणी, वीज, मोबाईल बिल असो की विमा पॉलिसी; प्रवास भाडे किंवा हॉटेलमध्ये जेवण; जिथे जिथे ग्राहकांना सेवा दिली जाते, त्या सर्व सेवा १ जूनपासून महागणार आहेत.

महागाईत सेवाकराचा ‘भडका’
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
पाणी, वीज, मोबाईल बिल असो की विमा पॉलिसी; प्रवास भाडे किंवा हॉटेलमध्ये जेवण; जिथे जिथे ग्राहकांना सेवा दिली जाते, त्या सर्व सेवा १ जूनपासून महागणार आहेत. कारण, केंद्र सरकारने सेवाकरात (सर्व्हिस टॅक्स) मध्ये ०.५ टक्के कृषी कल्याण सेवा उपकर अर्थात सेस अतिरिक्त आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सेवाकर १५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आधीच महागाईत होरपळलेल्या जनतेला आता सेवाकर वाढीचा दणका बसणार आहे. यामुळे सेवा घेण्यासाठी नागरिकांना आपला खिसा आणखी सैल करावा लागणार आहे.
सेवाकरात वाढ झाल्यामुळे पुढील आठवड्यात पाणी, वीज, मोबाईल, टेलिफोन बिल जादा आले तर आश्चर्य वाटायला नको. सध्या सेवाकर १४.५ टक्के आहे. १ जूनपासून प्रत्येक सेवा घेण्यासाठी ०.५ टक्के अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. वरकरणी ही दरवाढ कमी दिसत असली तरी कौटुंबिक बजेटमधील सर्वच सेवांना ही दरवाढ सोसावी लागणार असल्याने कौटुंबिक बजेटवर काही टक्क्यांनी भुर्दंड पडणार आहे. २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ जून २०१६ पासून कृषी कल्याण उपकर आकारणी करण्याची घोषणा केली होती. हा अतिरिक्त महसूल कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सेंट्रल एक्साईज विभागाने तयारी पूर्ण केली आहे. सेवा उद्योगानेही १ जूनपासून बिलामध्ये १५ टक्के सेवाकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक सेवा घेत असतो त्या सर्व सेवांवर उपकर लागणार आहे. विमा-बँकिंग सेवा महागणार, मोबाईल, फोनसेवा महागणार, पर्यटन, हॉटेलिंग, पार्लर सेवा महागणार, विवाहाच्या बजेटमध्ये वाढ होणार, मनोरंजनही महागणार आहे. याची अंमलबजावणी ६ दिवसांनंतर सुरू होणार आहे.