घुसखोरांना हाकलण्याचे संकट

By Admin | Updated: September 12, 2014 00:31 IST2014-09-12T00:21:01+5:302014-09-12T00:31:15+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध वसतिगृहांमध्ये जवळपास तीनशेहून अधिक तरुणांनी घुसखोरी केली आहे.

Infiltration crisis | घुसखोरांना हाकलण्याचे संकट

घुसखोरांना हाकलण्याचे संकट

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध वसतिगृहांमध्ये जवळपास तीनशेहून अधिक तरुणांनी घुसखोरी केली आहे. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रवेश मिळाल्यानंतरही वसतिगृहात राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, वसतिगृहांमध्ये बेकायदेशीर राहत असलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण संचालक, वसतिगृह अधीक्षक व अन्य प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरली आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी उद्या सकाळी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या बेकयदेशीर तरुणांचे लक्ष लागलेले आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठात एकूण १० वसतिगृहे आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहा, तर विद्यार्थिनींच्या ४ वसतिगृहांचा समावेश आहे. यापैकी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह, एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह व विद्यार्थी विश्रामगृह यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी राहत आहेत. शैक्षणिक कालावधी संपला तरी ते विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर निघत नाहीत. अनेक जण तर काही महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर अध्यापन करणारे कंत्राटी प्राध्यापक आहेत. याशिवाय काही संशोधक विद्यार्थी हे संशोधनाचा कालावधी संपला तरी ते विभागप्रमुख किंवा मार्गदर्शकांकडून संशोधनासाठी अर्जाद्वारे कालावधी वाढवून घेतात व त्याआधारे ते वसतिगृहातच राहत आहेत. काही जण नेट-सेटची तयारी करणारे विद्यार्थी आहेत.
वसतिगृहांमध्ये नियमबाह्य राहणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे अनेक गरजू विद्यार्थी हे नियमांनुसार प्रवेश मिळाल्यानंतरही वसतिगृहापासून वंचित आहेत. काही विद्यार्थ्यांना तर चक्क धमकावले जात आहे. वसतिगृहांमध्ये कसलीही शिस्त नाही. मागील दोन वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क माफ केले आहे. त्यामुळे वसतिगृहातील घुसखोरीचा पेच निर्माण झाल्याचे बोलले जाते.

Web Title: Infiltration crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.