विजय सरवदे, औरंगाबाद
औरंगाबाद शहराचा कायापालट करणारा ‘डीएमआयसी’ हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. एक नवीन उद्योगनगरी आकाराला येईल. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्योगाला पूरक असे संशोधन, शिक्षण व अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यक्त केला.
डॉ. चोपडे यांनी मार्च महिन्यात या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
उद्या २३ आॅगस्ट रोजी या विद्यापीठाचा ५६ वा वर्धापदन दिन असून त्यानिमित्त त्यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने सविस्तर बातचीत केली.
विद्यापीठाचा ‘रोड मॅप’ तयार करणार
प्रश्न : पुणे विद्यापीठात आपण सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख होता. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहात. कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जाबद्दल काय अनुभव आला.
उत्तर : महानगराशिवाय प्रचंड गुणवत्ता व क्षमता असलेले हे एकमेव राज्य विद्यापीठ आहे. नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त असलेली महानगरातील ६५ विद्यापीठे आहेत; पण शहरात असलेले ‘अ’ दर्जा प्राप्त असे हे राज्य विद्यापीठ आहे. मात्र, या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नाही. ती देण्याचे काम मी अग्रक्रमाने करणार आहे. प्रॉपर ट्रॅकवर येण्यासाठी थोडासा अवधी लागेल. सामाजिकशास्त्रे विभागात बहुतांश ग्रामीण भागातील मुलांची संख्या अधिक आहे. मात्र, ती मुले आपला सामाजिक अनुभव व व्यवहार याची सांगड घालताना दिसत नाहीत. त्यासाठी त्यांना चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. मी ८ ते ११ वर्षे संशोधन- अध्ययनासाठी विदेशात राहिलो. त्यानंतर मुंबई- पुणे यासारख्या महानगरात आलो. मात्र, माझी ग्रामीण भागाची नाळ अजून जुळलेली आहे. माझा ५ वर्षांचा कार्यकाळ आहे. या काळात विद्यापीठाचा ‘रोड मॅप’ करणार आहे.
प्रश्न : रोड मॅप नेमका कसा असेल?
उत्तर : संशोधनाच्या माध्यमातून केवळ स्वत:चे करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधनाकडे वळविले पाहिजे. केवळ विज्ञानातच संशोधन केले, तर पेटेंट मिळते, हा गैरसमज आहे. कला, सामाजिकशास्त्रे, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र या विकसित होणाऱ्या नव्या शाखा आहेत. यातही मूलभूत संशोधन झाले तर त्यालाही पेटेंट मिळू शकते. ते संशोधन आपल्या नावाने ओळखले जाते, हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे.
मराठवाडा ही कला, साहित्य, संस्कृतीची जन्मभूमी आहे.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी हा वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठात अजिंठा- वेरूळ संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू करणार. आज दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक अजिंठा- वेरूळला भेट देऊन जातात; पण त्यातील एकालाही विद्यापीठात जाऊन या संस्कृतीविषयी अधिकची माहिती जाणून घ्यावी, असे वाटत नाही. कारण, इथल्या कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठात तशी सुविधा नाही. लेणींचा अभ्यास करता येईल, असे कोर्स सुरू करून पर्यटकांना योग्य माहिती पुरवणारे ‘गाईड’ तयार करण्याची इच्छा आहे.
प्रश्न : केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास विद्यापीठाचे नेमके चित्र कसे असेल?
उत्तर : अलीकडच्या काही दिवसांपासून या विद्यापीठात शिक्षण घेतलेले विद्यार्थी संशोधनासाठी अन्य ठिकाणी जात आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे. हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रचंड गुणवत्ता असलेल्या प्रयोगशाळा येथे असायला हव्यात. केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास अशा प्रयोगशाळा व अत्यंत अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक मिळतील. केंद्रीय विद्यापीठाला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा निधी मिळत असतो. तो राज्य विद्यापीठाला मिळत नाही. वर्षाकाठी मिळालाच तर अवघे ८ ते १० कोटींचा निधी मिळतो. आपल्या विद्यापीठाला १५० ते २०० तज्ज्ञ प्राध्यापकांची वाढीव पदे मिळतील. तेव्हा या परिसरात समाज, उद्योग व व्यवसायाला पूरक संशोधन होईल. विद्यापीठ परिसर विकासाला चालना मिळेल.
ज्या कॉर्पोरेट कंपन्या दरवर्षी ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा नफा कमावतात. त्यांना आता ‘सामाजिक बांधिलकी’ या उपक्रमांतर्गत शासनाला निधी देणे बंधनकारक आहे. या माध्यमातून देशाला २५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळेल. त्यातील काही हिस्सा मिळविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. त्यासाठी अधिकार मंडळे, माझे सहकारी यांच्यासोबत समन्वय साधला जाईल. सर्वांनी सोबत घेऊन विद्यापीठाचा विकास केला जाईल.
प्रश्न : होऊ घातलेल्या ‘डीएमआयसी’ प्रकल्पाकडे आपण कोणत्या नजरेने बघणार? त्या अनुषंगाने आपण शैक्षणिक बदल करणार आहात का?
उत्तर : नक्कीच. ‘डीएमआयसी’ प्रकल्पात या भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल. काहींना आपले स्वत:चे उद्योग सुरू करता येतील, या अनुषंगाने गुणवत्ता व नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्याचा आपला मानस आहे. मी घड्याळ न बघता वेळ देतो. एकटा कुलगुरू हा ‘व्हिजन’ ठरवू शकतो; पण ते साध्य करण्यासाठी अन्य सहकाऱ्यांची साथ मिळणे तेवढेच गरजेचे आहे.
‘औषध निर्माणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र’ या आंतरविद्याशाखांना जास्त मागणी आहे. त्या दृष्टिकोणातूनही विचार करणार आहे. लवकरच विद्यापीठात ‘फार्मसी आणि अभियांत्रिकी’ विद्याशाखांचे स्वतंत्र विभाग सुरू करून त्याद्वारे पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधन सुरू केले जाईल. उद्योजकता विकास केंद्र स्थापन करून त्याद्वारे पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू केले जातील. वास्तवाचे भान ठेवून उणिवांचा शोध घेत बदल करावा लागेल.
उद्योगाला पूरक संशोधनावर भर देण्याचा प्रयत्न राहील
By admin | Updated: August 23, 2014 00:49 IST
विजय सरवदे, औरंगाबाद विद्यापीठात उद्योगाला पूरक असे संशोधन, शिक्षण व अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यक्त केला.
उद्योगाला पूरक संशोधनावर भर देण्याचा प्रयत्न राहील
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}