उद्योगनगरीत मालवाहतूकदारांचे इंधन दरवाढीविराेधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:02 IST2021-06-29T04:02:26+5:302021-06-29T04:02:26+5:30

:इंधन दरवाढीचा निषेध; केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केंद्र शासनाचा निषेध : औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पुढाकार वाळूज महानगर : ...

Industrialists' agitation against fuel price hike | उद्योगनगरीत मालवाहतूकदारांचे इंधन दरवाढीविराेधात आंदोलन

उद्योगनगरीत मालवाहतूकदारांचे इंधन दरवाढीविराेधात आंदोलन

:इंधन दरवाढीचा निषेध; केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

केंद्र शासनाचा निषेध : औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पुढाकार

वाळूज महानगर : औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने उद्योगनगरीत सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास इंधन दरवाढीविरोधात काळे झेंडे हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मालवाहतूकदारांनी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच इंधन दरवाढ मागे न घेतल्यास देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.

केंद्र शासनाकडून डिझेल व पेट्रोलच्या दरात भरमसाठ वाढ केली जात असल्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज खान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात काळे झेंडे हातात घेऊन इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. फैयाज खान म्हणाले की, गत मे व जून या दोन महिन्यांत २२ वेळा डिझेल व पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. इंधनाचे दर सतत वाढत असल्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय डबघाईला आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास ७ हजार मालवाहतूक करणारी वाहने असून, इंधन दरवाढीचा फटका मालवाहतूकदारांना सोसावा लागत आहे. याचबरोबर पथकर, आरटीओ तसेच पोलिसांकडून सतत अडवणूक केली जात असल्याने मालवाहतूकदार अडचणीत सापडल्याचा आरोप फैयाज खान यांनी केला. आंदोलनात असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, असद अहेमद, सचिव जयकुमार थानवी, एम.जी.इरफानी, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष युसूफ खॉन, संयोजक सुरेश पहाडे, मुकेश खंडेलवाल, राजू घोडे, जीवन साबू, राजेश कातकडे आदीसह ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची उपस्थिती होती.

देशव्यापी चक्काजामचा इशारा

इंधन दरवाढ मागे घेण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी असून, केंद्र व राज्य शासनाकडून इंधनावर मोठ्या प्रमाणात कर आकारत असल्याने इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. येत्या महिनाभरात केंद्र शासनाने इंधनाच्या दरात कपात न केल्यास ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्लीतर्फे देशभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज खान यांनी सांगितले.

फोटो ओळ

वाळूज एमआयडीसीत इंधन दरवाढीविरोधात औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज खान, जयकुमार थानवी, युसूफ खान, राजेंद्र माहेश्वरी आदींनी काळे झेंडे हातात घेऊन केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Web Title: Industrialists' agitation against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.