औद्योगिक वसाहतीतील हरीत पट्टे गायब...!
By Admin | Updated: April 6, 2017 23:40 IST2017-04-06T23:35:48+5:302017-04-06T23:40:02+5:30
जालना : जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक विकास महामंडळाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यादृष्टिने काही जागा हरित पट्टे म्हणून जाहीर केल्या होत्या.

औद्योगिक वसाहतीतील हरीत पट्टे गायब...!
जालना : जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक विकास महामंडळाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यादृष्टिने काही जागा हरित पट्टे म्हणून जाहीर केल्या होत्या. पैकी प्लॉट नं. एफ-११ परिसरातील १५ मिटर रुंदीचा हरित पट्टा गायब असून, तेथे संरक्षक भिंत उभारुन पट्टाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे.
वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळ हे स्वतंत्र खाते सुरु केलेले आहे. या मंडळ पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांनुसार सरकार पर्यावरण पूरक योजना राबवित असते. त्याच अनुषंगाने जालना शहरात दुसऱ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ रोवली जात असताना काही पर्यावरण पूरक नियम घालून देण्यात आले. हरित पट्टे हा त्यातीलच एक भाग. दुसऱ्या टप्प्याचे क्षेत्र हे १२३.४६ हेक्टर जमीन आहे. पैकी जवळपास १५ जागांवर काही मोकळे भूखंड वा उद्याने विकसीत करुन पर्यावरणाचा समतोल राखायचा, हा त्यामागील उद्देश. औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे आरोग्य सुस्थितीत रहावे हाही त्यामागील एक हेतू आहे. क्रीडा असो वा सार्वजनिक कार्यक्रम यासाठी या जागा राखीव ठेवण्याचा उद्देश आहे. परंतु काही उद्योजकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन या जागाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रकाराला वेळीच आळा घातला गेला नाही तर या हरित पट्ट्यांचाच श्वास गुदमरण्याची शक्यता अधिक आहे. अधिकारी आणि संरक्षक भिंत बांधून भूखंड हडप करणाऱ्याविरुध्द तात्काळ कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करणे गरजेचे आहे. यासंदर्भात एमआयडीसीचे क्षेत्रिय अधिकारी वायाळ म्हणाले की, सध्या दुसऱ्या टप्प्यातील राखीव भूखंड वा हरीत पट्ट्यांची निश्चित माहिती पाहणी करुन देतो, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)