उंडणगावात अनेक ठिकाणी मिळते देशी दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST2021-09-27T04:06:12+5:302021-09-27T04:06:12+5:30
उंडणगाव : गावात अवैध देशी दारूची सर्रास विक्री होत असून, गावातील कोणत्याही कोपऱ्यात दारू मिळते. यामुळे गावातील तरुण मुले ...

उंडणगावात अनेक ठिकाणी मिळते देशी दारू
उंडणगाव : गावात अवैध देशी दारूची सर्रास विक्री होत असून, गावातील कोणत्याही कोपऱ्यात दारू मिळते. यामुळे गावातील तरुण मुले व्यसनाधीनतेच्या आहारी जात असून, त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय मिळत असून, कोणी तक्रार केली तर ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ अशी कारवाई केली जाते. यानंतर पुन्हा जशीच्या तशी परिस्थिती निर्माण होते.
उंडणगाव हे तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहेत. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी येथील परवानाधारक देशी दारूचे दुकान स्थलांतर झाले. यानंतर गावात १५ ते २० अवैध देशी दारूचे अड्डे निर्माण झाले. त्यामुळे गल्लोगल्ली व कुठेही सहज दारू मिळू लागलेली आहे. या दारूमुळे अनेक नव तरुणांचे न भरणारे नुकसान झाले आहे, तर काहींचे जीवसुद्धा गेले आहेत. गावातील गल्लोगल्ली व जागोजागी आता मिळणारी दारू ही बंद करावी. जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व महिला वर्ग यांना त्रास होणार नाही. मात्र, कोणी तक्रार केलीच तर पोलीस नावापुरती कारवाई करतात. यात आर्थिक हितसंबंध असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. वरिष्ठांनी यात लक्ष घालून गावातील अवैध दारू बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.