मनपा निवडणुकीत युतीचे संकेत
By Admin | Updated: January 9, 2015 00:53 IST2015-01-09T00:47:08+5:302015-01-09T00:53:29+5:30
औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपाने मागितले होते. परंतु शिवसेनेकडे ते पद आल्यामुळे भाजपाला ‘काकण’ भर जास्त देण्याची भूमिका असल्याचे मत पालकमंत्री

मनपा निवडणुकीत युतीचे संकेत
औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपाने मागितले होते. परंतु शिवसेनेकडे ते पद आल्यामुळे भाजपाला ‘काकण’ भर जास्त देण्याची भूमिका असल्याचे मत पालकमंत्री तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज येथे व्यक्त केले. सेनेचा पालकमंत्री भाजपावर जास्त पे्रम करील, अशी ग्वाही देत त्यांनी मनपा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होण्याचे संकेतही दिले.
भाजपा आणि शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर अनेक वादविवाद सुरू असून, मनपा निवडणुका स्वतंत्र लढल्या जातील, असे तर्कवितर्क सध्या लढविले जात आहेत. अशातच पालकमंत्र्यांनी भाजपाला काकणभर जास्त देण्यात येणार असल्याचे सांगून युती करण्याचेही संकेत दिले. त्यामुळे दोन्ही पक्षात निर्माण झालेली दरी निवडणुकीच्या तोंडावर कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. दरम्यान, भाजपा सूत्रांनी युती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगितले. मात्र, पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले.
पालकमंत्री म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर बैठक घेतलेली नाही. भाजपाने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागितले होते. यापुढे युती कायम राहील, असे काम करू. रिपाइंलाही सोबतच ठेवू. त्यांच्यासाठीच्या योजना पोहोचविण्याचे काम केले जाईल. भाजपाला काकणभर जास्त देणे म्हणजे सेनेपेक्षा जास्त जागा देणे, असा अर्थ आहे का? यावर पालकमंत्री म्हणाले, तसे काही नाही. सापत्न वागणूक देणार नाही. त्यांची कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल. दुरावा येऊ देणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. जागा जास्त दिल्यास महापौर भाजपाचाच होईल. यावर कदम म्हणाले, तसे काहीही होणार नाही, त्याची काळजी आम्ही घेऊ. यावेळी खा.खैरे, संपर्क नेते घोसाळकर यांचीही उपस्थिती होती.
भाजपाने मांडल्या व्यथा
भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी महापौर डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष व इतरांनी कदम यांची भेट घेऊन शहराच्या समस्या मांडल्या. या भेटीप्रकरणी भाजपाकडून सांगण्यात आले, पक्षभेद होणार नाही, असे कदम यांनी सांगितले. दोन्ही पक्ष सोबत असतील. शहराची अवस्था, पाणीपुरवठा, पाणीपट्टी याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. युती करून निवडणूक लढविण्याबाबत त्यांनी भूमिका मांडली. परंतु याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, पथदिव्यांमुळे नागरिकांचे होणारे हाल आणि स्थानिक शिवसेना नेत्यांनी मनपात केलेली लुडबूड याची पूर्ण माहिती आज पालकमंत्र्यांना देण्यात आली. ४
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना टोला लगावणारी वक्तव्ये करून धूम उडवून दिली.
४सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे उद्घाटन १ फेबु्रवारी रोजी करण्याची डेडलाईन देऊन पालकमंत्र्यांनी यापुढे मीच साहेब आहे. मला याकामाची अपडेट माहिती देण्याचे आदेश मनपा अधिकाऱ्यांना दिले.
मी कोकणातला आहे. वारंवार इकडे येणार नाही, असे कुणीही समजू नये. मी जिल्हाधिकाऱ्यांना झोपू देणार नाही, आणि स्वत:ही झोपणार नाही. संग्रहालयाच्या कामाला निधी कमी पडला तर सांगा, त्याची तातडीने तरतूद केली जाईल. संग्रहालयाच्या कामाची दर आठ दिवसांनी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.