सायबर क्राईमचे हवे स्वतंत्र पोलीस ठाणे
By Admin | Updated: January 24, 2017 22:36 IST2017-01-24T22:36:12+5:302017-01-24T22:36:50+5:30
लातूर तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

सायबर क्राईमचे हवे स्वतंत्र पोलीस ठाणे
राजकुमार जोंधळे लातूर
तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या गुन्ह्यांच्या तपास कामासाठी जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम सेलला आता पाठबळ देण्यात आले आहे. भविष्यात महावितरणच्या धर्तीवर या ठाण्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. प्रायोगिक तत्त्वावर म्हणून सायबर सेल अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न गृहविभागाकडून सुरू आहेत.
लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत जवळपास १ हजार १५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील ७५ टक्क्यांच्या आसपास गुन्ह्यांचा सायबर लॅबच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उलगडा झाला आहे. भविष्यातील सायबर गुन्हेगारी लक्षात घेऊन राज्याच्या गृहविभागाने त्या-त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एकाच दिवशी राज्यात सायबर सेल या विभागाचे नूतनीकरण आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या सायबर क्राईम अंतर्गत तक्रारींचा उलगडा होण्यासाठी सायबर सेलची मदत घ्यावी लागते. सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून होणारे सायबर क्राईम रोखण्यासाठी आता जिल्हास्तरावर स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज आहे. त्यानुषंगाने या सायबर लॅबचे नूतनीकरण करण्यात आले आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन आॅगस्ट २०१६ मध्ये पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सायबर लॅबमुळे सध्याला अत्याधुनिक यंत्रणा आणि त्यासाठी लागणारी अत्याधुनिक व्हॅन पोलीस दलात दाखल झाली आहे.
गंभीर गुन्हा घडल्यानंतर तातडीने ही व्हॅन घटनास्थळी दाखल होते. त्यामुळे पुरावे आणि त्याबाबतचे बारकावे टिपण्यासाठी व्हॅनचा वापर केला जात आहे. शिवाय, गुन्हेगारांचे लोकेशन शोधण्यासाठी या लॅबचा उपयोग होत आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सायबर लॅबमधील यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.