टाऊनशीपसाठी स्वतंत्र प्राधिकरण
By Admin | Updated: July 3, 2017 00:59 IST2017-07-03T00:58:50+5:302017-07-03T00:59:23+5:30
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नियोजित टाऊनशीपच्या (कृषी समृद्धी केंद्र) विकासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची ‘नवनगर विकास प्राधिकरण’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

टाऊनशीपसाठी स्वतंत्र प्राधिकरण
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नियोजित टाऊनशीपच्या (कृषी समृद्धी केंद्र) विकासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची ‘नवनगर विकास प्राधिकरण’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे टाऊनशीपमधील सुविधांचा प्रस्ताव, आराखडा व नियमावली तयार करण्याचे काम या पुढे प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, श्रीकृष्णनगर, गुंडेवाडी शिवारातील काही भागात नियोजित टाऊनशीप झाल्यास या परिसरात विकास कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधिकरणाची परवानी घ्यावी लागणार आहे.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर २४ ठिकाणी सुनियोजित टाऊनशीप विकसित केल्या जाणार आहेत. टाऊनशीपसाठी अधिसूचित जमिनीवर औद्योगिक, कृषी विकास, शैक्षणिक, निवासी, असे झोन तयार करण्यात येणार आहेत. सदर झोनमध्ये करावयाच्या कामांचा आराखडा, विकास कामांची नियमावली तयार करण्याचे काम नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर या भागातील काही जमीन टाऊनशीपसाठी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुपिक व अकृषक जमिनी जाण्याच्या भितीने शेतकऱ्यांकडून टाऊनशीपला विरोध केला जात आहे. शासनाचा नवनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा अध्यादेश शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.
शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात काही करायचे झाल्यास रस्ते विकास महामंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी हक्क बचाव समितीचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर यांनी केली आहे.