स्वातंत्र्यदिनापूर्वी १५ ठाणी होणार ‘आयएसओ’
By Admin | Updated: June 10, 2017 00:03 IST2017-06-10T00:02:22+5:302017-06-10T00:03:31+5:30
बीड : शिस्तबद्ध काम, ठाण्यातील नीटनेटकेपणा व सर्वसामान्यांना दिलेल्या सन्मानाच्या वागणुकीवर सात ठाण्यांनी आयएसओ मानांकन प्राप्त केलेले आहे,

स्वातंत्र्यदिनापूर्वी १५ ठाणी होणार ‘आयएसओ’
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिस्तबद्ध काम, ठाण्यातील नीटनेटकेपणा व सर्वसामान्यांना दिलेल्या सन्मानाच्या वागणुकीवर सात ठाण्यांनी आयएसओ मानांकन प्राप्त केलेले आहे, तर पोलीस अधीक्षक कार्यालयासह आणखी ७ ठाण्यांची वाटचाल आयएसओच्या दिशेने सुरू आहे. १५ आॅगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील १५ ठाणी आयएसओ करण्याचा संकल्प बीड जिल्हा पोलीस दलाने केला आहे.
बहुतांश ठाण्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह येथे तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना सुविधा नसतात, तसेच ठाण्यासाठी व्यवस्थित इमारत नसते. कोणालाही शिस्त नसते. त्यामुळे हे ठाणे आहे की धर्मशाळा, याबाबत अनेकांत संभ्रम असायचा; परंतु प्रशासनाने एक चांगले पाऊल उचलत ठाण्यांना आयएसओ देण्याचा निर्णय घेतला. हे आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी निकष घालून देण्यात आले. या निकषांमुळे ठाण्यातील परिस्थिती बदलू लागली. ठाण्यांचा कारभारही सुधारला. आतापर्यंत जिल्ह्यातील १० ठाण्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यापैकी ७ ठाणी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आल्यापासून आयएसओ झाली आहेत.
ठाण्यातील कार्यतत्परता तपासणे, नीटनेटकेपणा, जनसामान्यांची वागणूक, ठाण्याच्या हद्दीतील गावे व गावांतील नागरिकांचा संपर्क, सर्वसामान्यांत पोलीस ठाणे व तेथील अधिकाऱ्यांबाबतची माहिती व त्यांच्याशी संपर्क, ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा निपटारा, दस्तऐवज, कागदपत्रे सांभाळण्याची नेमकी पद्धत, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, संगणक, फर्निचर आदींचे मूल्यांकन संबंधित आयएसओ टीमने येऊन केल्यानंंतर ठाण्यांना हे मानांकन प्राप्त झाले आहे.