घाटीत नवजात शिशूंसाठी इन्क्युबेटर हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:18+5:302021-01-13T04:09:18+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात शिशूंचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना सदोष ...

Incubator deportation for newborns in the valley | घाटीत नवजात शिशूंसाठी इन्क्युबेटर हद्दपार

घाटीत नवजात शिशूंसाठी इन्क्युबेटर हद्दपार

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात शिशूंचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना सदोष इन्क्युबेटरमुळे घडल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. घाटीतील नवजात शिशू विभागात यापूर्वीच इन्क्युबेटरचा वापरच हद्दपार करण्यात आला आहे. इन्क्युबेटरची हाताळणी अवघड आणि दुरुस्ती खर्चही अधिक असतो. शिवाय संसर्गाचाही धोका असतो. इन्क्युबेटरऐवजी केवळ ओपन केअर वार्मरचा वापर याठिकाणी केला जात आहे.

घाटीतील नवजात विभागाच्या नव्या ‘एनआयसीयू’मध्ये ३० आणि प्रसूतीशास्त्र विभागात असलेल्या जुन्या ‘एनआयसीयू’त १० वार्मर आहेत. त्या तुलनेत कोणत्याही वेळेस येथे कितीतरी जास्त नवजात शिशू या विभागामध्ये वेगवेगळ्या उपचारांसाठी दाखल असतात. जन्मानंतर कमी वजनासह अनेक कारणांनी याठिकाणी शिशूंना दाखल करावे लागते. शिशूंच्या उपचारासाठी केवळ ओपन केअर वार्मरचा वापर केला जात आहे. इन्क्युबेटरचा वापर येथे केला जात नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

काचेची पेटी म्हणजे इन्क्युबेटर

सर्वसाधारण लाेक शिशूंना काचेच्या पेटीत ठेवल्याचे म्हणतात. ही काचेची पेटी म्हणजेच इन्क्युबेटर. हे बंदिस्त स्वरूपात असते. एक किलोपेक्षा कमी वजन असणाऱ्या शिशूंसाठी हे वापरले जाते, तर वार्मर हे ओपन असते. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, नवजात शिशू विभागातील उपकरणांची खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे.

संसर्गाचाही असतो धोका

आपल्याकडे इन्क्युबेटरचा वापर होत नाही. कारण त्याच्या मेंटनन्सचा खर्च अधिक असतो. दर्जात्मक इन्क्युबेटर ठेवले तरी त्याची हाताळणी करणेही अवघड असते. शिवाय ओपन केअर वार्मरच्या तुलनेत इन्क्युबेटरमध्ये संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आपल्याकडे सर्व वार्मरच आहेत. केवळ लेबर रुममधून वॉर्डात शिशूंना आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर आहे; परंतु तेही फार क्वचित वापरले जाते.

- डॉ. एल. एस. देशमुख, नवजात शिशू विभागप्रमुख, घाटी.

फोटो ओळ...

घाटीतील नवजात शिशू विभाग.

Web Title: Incubator deportation for newborns in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.