शिक्षेचा वधारतोय टक्का..!
By Admin | Updated: April 8, 2017 23:20 IST2017-04-08T23:17:30+5:302017-04-08T23:20:10+5:30
उस्मानाबादपोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या दोष सिद्धीेचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह कन्विक्शन विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे़

शिक्षेचा वधारतोय टक्का..!
विजय मुंडे उस्मानाबाद
पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या दोष सिद्धीेचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह कन्विक्शन विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे़ चालू वर्षात सत्र न्यायालयात चाललेल्या ४९ खटल्यांचा निकाल लागला असून, ११ प्रकरणात दोषींना शिक्षा झाली आहे़ याचे शेकडा प्रमाण २२़४४ टक्के आहे़ मार्च २०१५ पर्यंतच्या तिमाहीत १६.३६ टक्के तर मार्च २०१६ मधील तिमाहीत असलेले ५़५५ टक्क्यांचे प्रमाण वाढून २२़४४ टक्क्यांवर गेले आहे़
पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनस्तनावरून वेळोवेळी सूचना देण्यात येतात़ न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांवर लक्ष ठेवून पाठपुरावा करण्यासाठी कोर्ट पैरवी कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तसेच समन्वयासाठी स्वतंत्र कन्विक्शन सेल कार्यरत आहे़ या विभागातून न्यायालयात चालणाऱ्या दैनंदिन केसेसबाबत कामकाज पाहिले जाते़ तसेच न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांच्या अनुषंगाने साक्षीदारांना मार्गदर्शन करणे, समन्स, वॉरंट बजावणीकडे लक्ष देणे, शिक्षा लागलेल्या व सुटलेल्या केसेसचा अभ्यास करणे, गुणवत्तेवर अपीलविषयक निर्णय घेणे, दैनंदिन व माहिनेवारी अहवाल विषयक कामकाज या विभागामार्फत केले जात आहे़ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गत दाखल प्रकरणातील दोष सिध्दतेचे प्रमाण वाढावे यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्विक्शन सेलचे सपोनि राजेंद्र बनसोडे व त्यांच्या टीमने काम सुरू केले आहे़ २०१४ मधील दोष सिद्धतेचे वार्षिक प्रमाण १२़९४ टक्के होते़ या वर्षात एकूण २०१ खटले निकाली निघाले़ यात केवळ २६ प्रकरणात शिक्षा झाली तर १७५ प्रकरणात दोष सिद्धता झाली नाही़ या वर्षात जानेवारीतील २३ व फेब्रवारीतील १० केसेसपैकी एकाही केसमध्ये शिक्षा झाली नव्हती़ उर्वरित १० महिन्यात २६ प्रकरणात शिक्षा झाली आहे़ सन २०१५ मध्ये दोष सिध्दतेचे वार्षिक प्रमाण १५़४९ टक्के होते़ या वर्षात २२६ प्रकरणे निकाली निघाली़ यात केवळ ३५ प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली तर १९१ प्रकरणात दोष सिद्धता झाली नाही़ या वर्षात आॅक्टोबर महिन्यातील १९ पैकी ५ प्रकरणात शिक्षा झाली आहे़ सन २०१६ मधील दोष सिध्दतेचे वार्षिक प्रमाण केवळ ७़६९ टक्के होते़ या वर्षातील २३४ प्रकरणांपैकी केवळ १८ प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली़ तर इतर १९१ प्रकरणात दोष सिद्धता झाली नाही़ जानेवारी २०१६ मधील २५ व जून २०१६ मधील २१ पैकी एकाही प्रकरणात आरोपिंना शिक्षा झाली नाही़ फेब्रुवारीत २३ पैकी २, मार्च मध्ये २४ पैकी २, एप्रिलमध्ये २२ पैकी १, मे मध्ये २४ पैकी २, जुलैमध्ये १५ पैकी १, आॅगस्टमध्ये १६ पैकी २, सप्टेंबरमध्ये १८ पैकी १, आॅक्टोबरमध्ये १७ पैकी ३, नोव्हेंबरमध्ये १२ पैकी १ तर डिसेंबर २०१६ मध्ये १७ पैकी केवळ ३ प्रकरणात दोष सिद्धी झाली होती़