प्रसुती शस्त्रक्रियेचे वाढते प्रमाण चिंताजनक
By Admin | Updated: May 22, 2017 00:13 IST2017-05-22T00:10:29+5:302017-05-22T00:13:15+5:30
जालना : खासगी रुग्णालयांमध्ये प्रसुती शस्त्रक्रियेचा टक्का दिवसेंदिवस वाढत असून, याउलट शासकीय रुग्णालयांतील परिस्थिती आहे.

प्रसुती शस्त्रक्रियेचे वाढते प्रमाण चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खासगी रुग्णालयांमध्ये प्रसुती शस्त्रक्रियेचा टक्का दिवसेंदिवस वाढत असून, याउलट शासकीय रुग्णालयांतील परिस्थिती असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. खासगी रुग्णालयात प्रसुती शस्त्रक्रियेचे प्रमाणे ७० टक्क्यांहून अधिक आहे. हेच प्रमाण शासकीय रुग्णालयात केवळ दहा टक्क्यांपर्यत आहे. प्रसुती शस्त्रक्रियेचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, यावर नियंत्रण असायला हवे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
महिलेची प्रसुती हा कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काळजी व जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातच नैसर्गिक प्रसुतीला सर्वांचे प्राधान्य असते.
अपवादात्मक स्थितीत गंभीर वैद्यकीय कारणास्तव गर्भवतीवर प्रसुती शस्त्रक्रिया करावी लागते. परंतु अनेकदा विशेष वैद्यकीय कारण नसतानाही प्रसुती शस्त्रक्रिया करण्याचे प्रकार काही रुग्णालयात सर्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय, अंबडमधील उपजिल्हा रुग्णालय आणि आठ ग्रामीण रुग्णालये मिळवून वर्षभरात दहा हजार ५२८ महिला प्रसूत झाल्या आहेत. पैकी केवळ ४०९ महिलांवर गंभीर वैद्यकीय कारणांमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. याउलट जालना शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ अखेर सहा हजार ५२५ प्रसुती झालेल्या आहेत. पैकी सुमारे चार हजार गर्भवतींवर प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे नगरपालिकेतून प्राप्त आकडेवारीतून स्पष्ट होते.