ऑनलाईन शिक्षणाने पालकांचा वाढला खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST2021-07-14T04:06:32+5:302021-07-14T04:06:32+5:30

जयेश निरपळ गंगापूर : कोरोनामुळे सर्वांत जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे, त्यात यंदाही विद्यार्थ्यांना आभासी शिक्षणच द्यावे असे शिक्षण ...

Increased cost of parenting by online education | ऑनलाईन शिक्षणाने पालकांचा वाढला खर्च

ऑनलाईन शिक्षणाने पालकांचा वाढला खर्च

जयेश निरपळ

गंगापूर : कोरोनामुळे सर्वांत जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे, त्यात यंदाही विद्यार्थ्यांना आभासी शिक्षणच द्यावे असे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. विद्यार्थी घरातच बसून शिक्षण घेत असल्याने वाहतुकीचा खर्च जरी कमी झाला तरी पालकांना इतर शैक्षणिक खर्चासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. कारण शाळेत शैक्षणिक शुल्क भरण्याबरोबरच संसाधनावरही खर्च करावा लागत आहे, तर दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते, ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी असून, शैक्षणिक प्रगतीदेखील खूप कमी आहे.

कोरोनाकाळात शिक्षणपद्धतीत पूर्णत: बदल झाला आहे. शालेय शिक्षणाने मोबाईल आणि संगणकीय शिक्षणावर भर दिला आहे. त्यामुळे पालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मोबाईल, टॅब, संगणक खरेदीसाठी १५ ते २० हजारांची अवेळी तरतूद केल्यानंतर आता नेटसाठी दरमहा रिचार्जचा खर्च सुरू झाला आहे. कोरोनामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असताना शिक्षणावरील अतिरिक्त खर्चाने सर्वसामान्यांची गोची होत आहे, तर हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या आभासी शिक्षणाचा गंधसुद्धा नाही. गेल्या सत्रात शिक्षण ऑनलाईन झाले; पण त्याचे फलित काही निघाले नाही. बऱ्याच वेळा येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन शिक्षण हे केवळ नावापुरतेच राहिले आहे.

---

माझ्या घरी दोन मुले आहेत. दोघांचीही शाळेची फी भरायची आहे. पुस्तके, वह्या घ्यायच्याच आहेत. दोघांसाठी दोन मोबाईल आहे. त्यांचा इंटरनेटवरचा महिन्याचा खर्च आहेच. फी नाही भरली तर विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले जाते. - ललिता म्हस्के, पालक.

---

ऑनलाईन शिक्षणात नवीन साधनांची गरज भासू लागली आहे. जसे हेडफोन, ब्लू टूथ हवे. मोबाईलसुद्धा चांगल्या क्षमतेचा हवा असून, पाल्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अभ्यासाच्या कारणांनी त्या पूर्ण कराव्या लागतात. - ज्ञानेश्वर चौधरी, पालक.

---

मोबाईलच्या वापरामुळे मुलांचे शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक नुकसान हाेत असून, मोबाईल वापराने घरातील संवाद खुंटला आहे. यात यू-ट्युबच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे मुलांची चिडचिड वाढली आहे. अशावेळी पालकांनी मुलांशी संवाद वाढवून आराेग्याची काळजी घेतली पाहिजे.- डॉ. नितीन वालतुरे,

तालुक्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली :११,६११

दुसरी :११,५२६

तिसरी :११,४३५

चौथी :११,५६८

पाचवी :११,२००

सहावी :१०,८४३

सातवी :१०,४९६

आठवी :९,८३२

नववी :९,२३८

दहावी :८,४६९

Web Title: Increased cost of parenting by online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.