जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ
By Admin | Updated: September 2, 2014 01:54 IST2014-09-02T01:32:50+5:302014-09-02T01:54:44+5:30
औरंगाबाद : मघापाठोपाठ निघालेल्या पूर्वा नक्षत्रातही जिल्ह्यात सर्वदूर वृष्टी होत आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असून कन्नड तालुक्यातील गडदगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ
औरंगाबाद : मघापाठोपाठ निघालेल्या पूर्वा नक्षत्रातही जिल्ह्यात सर्वदूर वृष्टी होत आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असून कन्नड तालुक्यातील गडदगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. पावसाने जिल्ह्यात पडझडीच्या अनेक घटना घडल्या असून नदी-नाले भरून वाहत आहेत.
नागद परिसरात झालेल्या जोरदार पावसाने नागद येथील गडदगड मध्यम प्रकल्प तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मागील वर्षीसुद्धा हा प्रकल्प आॅगस्ट महिन्यातच ओव्हर फ्लो झाला होता. सुरुवातीला पावसाळा एकदमच कमी प्रमाणात होता. जून महिन्यात फक्त ३० मि.मी., जुलै महिन्यात १३ मि.मी. पाऊस पडला होता. खरीप हंगाम हातचा गेला. आॅगस्ट महिन्यात १८५ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे नागद सर्कलमधील व परिसरातील आॅगस्ट महिन्यात १८५ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे नागद सर्कलमधील व परिसरातील छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहे. आतापर्यंत एकूण ३५० मि.मी. पाऊस पडला. गडदगड मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता के.जे. गोरे, पाणी वाटप संस्थांचे चेअरमन सुभाष महाजन, रमेश शिरा यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
लासूरगाव- पूर्वा नक्षत्राच्या पावसाने दमदार सुरुवात केली असून ३१ आॅगस्ट (रविवार)च्या मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी ५८ मि.मी. पाऊस एकाच दिवसात झाला. या तुफान पावसामुळे येथील रंगार टेकडीवरील पुरातन कालिका माता मंदिराच्या दक्षिणेकडील भिंत पूर्ण पडली आहे. त्यामुळे मंदिराचे बरेच नुकसान झाले आहे. १ सप्टेंबरपर्यंत ३६० मि.मी. पावसाची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात झाली आहे.
चितेगाव-येथे झालेल्या भीजपावसाने भिंत कोसळून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. सोमवारी सकाळी ६ वाजता येथील रहिवासी लक्ष्मण वाघ यांच्या घराजवळील दगडी बांधकाम केलेली भिंत कोसळल्याने याखाली घरातील संसारोपयोगी वस्तूंचा चुराडा झाला. सकाळची वेळ असल्याने याठिकाणी नेहमी घरातील कुटुंबाच्या सदस्यांची ये-जा असते; परंतु यावेळी येथे कोणी व्यक्ती नसल्याने जीवित हानी टळली. घटनास्थळी तलाठी विमल बांगर, बबन साबळे यांनी पाहणी केली.
घाटनांद्रा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील मक्याचे पीक भुईसपाट झाले आहे.
मागील १० दिवसांपासून खरिपाच्या पिकास तुरळक कोसळणाऱ्या सरीमुळे जीवदान मिळाले होते. त्या पावसामुळे पिकाची वाढ देखील चांगल्या प्रकारे झाली होती; परंतु शनिवारच्या मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान झाले. या भागातील तलावात ४० ते ५० टक्के पाणी साठा झाला.
नांदर येथील बंधारा भरला
सततच्या पावसाने पैठण तालुक्यातील नांदर येथील बंधारा पूर्ण भरला आहे. खोलीकरणानंतर पुढील काम न झाल्याने बंधाऱ्यातून पाणी वाया जात आहे. या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यामुळे या बंधाऱ्याचे उर्वरित काम पूर्ण करावे, अशी मागणी सरपंच यशवंतराव काळे यांनी केली आहे. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)