‘जायकवाडी’च्या जलसाठ्यात वाढ
By Admin | Updated: July 6, 2016 00:18 IST2016-07-06T00:03:43+5:302016-07-06T00:18:35+5:30
पैठण : मृत साठ्यातून उपसा सुरू असलेल्या जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा प्रथमच धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

‘जायकवाडी’च्या जलसाठ्यात वाढ
पैठण : मृत साठ्यातून उपसा सुरू असलेल्या जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा प्रथमच धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. दोन दिवसांत धरणात २.७५ दलघमीने जलसाठ्यात वाढ झाली आहे. या धरणात ५५० क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत असल्याची माहिती दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी १४ मार्च २०१६ रोजी मृत साठ्याखाली गेल्याने गत साडेतीन महिन्यांपासून मृत साठ्यातून उपसा करण्यात येत होता. धरणाची पाणी पातळी १४९४.५० फुटाच्या खाली गेल्यास मृत साठा सुरू होतो. यंदा १४ मार्च रोजी पाणी पातळी मृत साठ्याखाली गेली, तेव्हापासून मृत साठ्यातून पिण्याच्या पाण्यासाठी उपसा सुरू आहे. धरणाच्या मृतसाठ्यात ७३८.५० दलघमी जलसाठा असतो. यापैकी १४ मार्च ते ५ जुलै यादरम्यान २६५.७०० दलघमी पाणी उपसा करण्यात आलेला आहे. त्यामुळे धरणात मृतसाठ्यात केवळ ४७२.३९८ दलघमी एवढा जलसाठा शिल्लक राहिला आहे.
मृतसाठ्यातील ७३८.५० दलघमीपैकी फक्त ३६९.२५ दलघमी जलसाठा वापरता येतो. या जलसाठ्यापैकी सोमवारपर्यंत (दि.४) २६५ दलघमी पाणी वापरण्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाकडे केवळ १०४ दलघमी जलसाठा शिल्लक होता.
या शिल्लक जलसाठ्यातून औरंगाबाद शहरासह सर्व पाणीपुरवठा योजनांना आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होते. यामुळे जायकवाडी प्रशासनास मोठी चिंता लागली होती.