रेशन दुकानांची संख्या वाढवा

By Admin | Updated: July 8, 2014 01:00 IST2014-07-07T22:54:29+5:302014-07-08T01:00:59+5:30

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे, तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

Increase the number of ration shops | रेशन दुकानांची संख्या वाढवा

रेशन दुकानांची संख्या वाढवा

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे नवीन रेशन कार्ड वाटप तात्काळ सुरु करावे, तसेच तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात आयोजित अंबड-घनसावंगी तालुका अन्न सुरक्षा योजना आढावा बैठकीत बोलताना दिले.
टोपे म्हणाले, अन्नसुरक्षा योजना अत्यंत चांगली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी असमाधानकारक आहे. प्रशासन, स्वस्त धान्य दुकानदार, सामान्य नागरिक सर्वांनी एकत्र येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे पुरवठा करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याबाबत सर्वात जास्त तक्रारी या लाभार्थ्यांच्या यादीबाबत आहेत. लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत. वास्तविक लाभार्थ्यांच्या याद्या प्रशासनाने बनविण्याची आवश्यकता होती, मात्र हे काम स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविण्यात आल्याने याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या. स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करुन नवीन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड तात्काळ वितरित करण्यात यावेत, सुधारित याद्या सार्वजनिक ठिकाणी, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी सामान्यांना पाहता येतील अशा ठिकाणी लावाव्यात, नवीन याद्या तयार झाल्यानंतर वाढीव लाभार्थ्यांचे वाढीव नियतन स्वस्त धान्य दुकानदारांना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची राहिल, दुकानदारांना तात्काळ वाढीव नियतन देण्यात यावे, अन्नसुरक्षा योजना सर्वसामान्य गरीब जनतेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी असल्याची जाणीव प्रशासनातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार आदींनी ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दक्षता समिती, तलाठी, गावचे सरपंच आदींनी परिश्रम घेण्याची गरज आहे. हक्काचे धान्य मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होतो व त्याची झळ लोकप्रतिनिधींना सहन करावी लागते. स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे अन्यथा प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आठवड्यातून किमान तीन दिवस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी ग्रामीण भागात जाऊन स्वस्त धान्य वाटपावर लक्ष ठेवावे. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार अहमद देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अंबडचे तहसीलदार महेश सावंत, घनसावंगीचे तहसीलदार अभय चव्हाण, जि.प.सदस्य अ‍ॅड.संजय काळबांडे, दत्ता वाघ, नंदकुमार देशमुख, तात्यासाहेब चिमणे, मधुकर देशमुख, कपिल राऊत, रमेश पैठणे, रामदास कुरणकर, शिवाजी मस्के, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, अंबडचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, गोंदीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
नवीन रेशनकार्ड तात्काळ द्यावे
नवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया थांबविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आपणास प्राप्त झाल्या आहेत. नवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया तहसील कार्यालयामध्ये का थांबविण्यात आली आहे, हे समजत नाही. नवीन रेशनकार्ड देण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी.
धान्य तस्कर दुकानदारांच्या सहाय्याने सामान्यांच्या हक्काचे धान्य मुंबई, पुणे आदी मोठया शहरांमध्ये काळया बाजारात पाठवितात. काळया बाजारात धान्य पाठविणे, चढ्या भावाने धान्य विक्री करणे कदापी खपवून घेतले जाणार नाही, अशा दुकानदार तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

Web Title: Increase the number of ration shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.