दोन जीप धूळखात पडल्याने गैरसोय
By Admin | Updated: December 15, 2015 23:30 IST2015-12-15T23:23:51+5:302015-12-15T23:30:28+5:30
कळमनुरी : येथे पोलिस ठाण्याला दोन जीपसह व्हॅन देण्यात आलेल्या आहेत; परंतु या दोन्ही जीपला बॅटऱ्या नसल्याने ही वाहने धूळखात पडली आहेत.

दोन जीप धूळखात पडल्याने गैरसोय
कळमनुरी : येथे पोलिस ठाण्याला दोन जीपसह व्हॅन देण्यात आलेल्या आहेत; परंतु या दोन्ही जीपला बॅटऱ्या नसल्याने ही वाहने धूळखात पडली आहेत.त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
येथील ठाण्याला एक जुनी जिप्सी वाहन देण्यात आले आहे. हे वाहनही जुने असल्याने यातून प्रवासही जिकिरीचा बनतो. या जुन्या व खराब वाहनानेच दिवसा व रात्री पेट्रोलिंग करावी लागते. या व्हॅननेच ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७१ गावांचा कारभार पहावा लागत आहे. एखादी अनुचित घटना घडली तर या जिप्सी वाहनानेच जावे लागते. त्यामुळे पोलिसांना उशीर होतो. कळमनुरी ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ७१ गावाअंतर्गत दीड लाख लोकसंख्या आहे. मात्र बंदोबस्तासाठी अपुरे कर्मचारी आहेत. शिवाय वाहनही नसल्याने येथील पोलिस ठाणे अडचणीत सापडले आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहाय’ हे ब्रीद असलेल्या पोलिसांजवळ अपुरे कर्मचारी व चांगले वाहन नसल्याने ते खरे ठरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अचानक मोठी घटना घडली की या जिप्सी वाहनानेच जावे लागते. २ ते ३ महिन्यांपासून ठाण्यातील दोन्ही जीप बंद असल्याने एकाच वाहनावर ठाण्याचा कारभार सुरू आहे. शांतता व सुव्यवस्था ठेवणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. मोर्चे, नाकाबंदी, पेट्रोलिंग, आंदोलने, धरणे, उपोषण, रास्ता रोको, विविध ठिकाणचा बंदोबस्त, अचानक उद्भवलेले तंटे मिटविणे, गुन्ह्याचा तपास लावणे, अपघात स्थळी पोहोचणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात. त्यातच वाहन नसल्याने ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मोठी अडचण येते. वाहनांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)