नरेगात अपूर्ण कामांची जंत्री
By Admin | Updated: June 23, 2017 23:23 IST2017-06-23T23:19:29+5:302017-06-23T23:23:37+5:30
हिंगोली : जिल्ह्यातमग्रारोहयोची कामे वेळेत सुरू न केल्याचे परिणाम दरवर्षी भोगावे लागतात.

नरेगात अपूर्ण कामांची जंत्री
हिंगोली : जिल्ह्यातमग्रारोहयोची कामे वेळेत सुरू न केल्याचे परिणाम दरवर्षी भोगावे लागतात. अर्धवट कामे ठेवण्याचे प्रमाण वाढत जात असल्याने नंतर अशा कामांवरील शासन खर्च वायाही जातो. यंदाही तब्बल ३६९८ कामे अर्धवट असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षीच नोव्हेंबरनंतर मग्रारोहयोतील कामांना गती देणे अपेक्षित असताना एप्रिल-मे महिन्यात प्रशासनाला जाग येते. तोपर्यंत लोकप्रतिनिधी, शासन असा सगळीकडून रेटा वाढलेला असतो त्यामुळे हे सोपस्कार पूर्ण करायचे असतात. त्यात कामेही भरमसाठ सुरू केली जातात. ती पूर्ण कधी होतील, याचा साधा अंदाजही बांधला जात नाही. शिवाय मजुरांना काम उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याने ही कामे सुरू करावीही लागतात.
औंढा तालुक्यात ३२१0, वसमत-११९१, हिंगोली-३७१६, कळमनुरी-२0८३, सेनगाव-४७३३ अशी सुरू झालेल्या कामांची संख्या १४९३३ एवढी होती. यापैकी ६८५४ कामे पूर्ण झाली. तर हे प्रमाण ५४ टक्के आहे. सर्वाधिक ६२ टक्के कामे वसमतमध्ये पूर्ण झाली आहेत. तर अपूर्ण राहिलेली ३१५६ कामे रद्द करावी लागली. तरीही औंढा-१0१३, वसमत-१८२, हिंगोली-८३५, कळमनुरी-५५७, सेनगाव-११११ अशी रखडलेल्या कामांची तालुकानिहाय संख्या आहे. अनेक कामे दुसऱ्या वर्षी पुन्हा सुरू केली जात नाहीत. त्याचा ताळमेळही बहुतेक यंत्रणा ठेवत नाहीत.
काही ठिकाणी ग्रामस्थांनी रेटा लावला म्हणूनच ही कामे पूर्ण करण्याची तसदी घेतली जाते. तर अर्धवट कामांवर शासनाने केलेला खर्च मात्र वाया जातो. निदान हे टाळण्यासाठी तरी ही बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी नवे डीएसआर दर आल्याने अंदाजपत्रक सुधारित करावे लागते. मूळ कामासाठीच मोठे हेलपाटे खावे लागल्याने यंत्रणा रखडलेल्या कडे दुर्लक्ष करतात. त्याचाही परिणाम या कामांवर होतो. वैयक्तिक लाभाच्या योजनांत तेवढा लाभार्थीच पाठपुरावा करतो. त्यालाही कार्यारंभ आदेश देण्यापासून, वेळोवेळी मोजमाप, मस्टर, लाभाची रक्कम मिळण्यासाठी त्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाला खुश करताना काळजावर दु:खाच्या डागण्या लावून घ्याव्या लागतात.