वर्षाला साडेतीन लाखांचे उत्पन्न वाढणार
By Admin | Updated: July 4, 2016 00:25 IST2016-07-04T00:04:43+5:302016-07-04T00:25:53+5:30
लातूर : लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकातील विद्युत खांबावर विविध पक्ष संघटना तसेच खाजगी कोचिंग क्लासेसमार्फत जाहिरात फलक लावण्यात येतात़

वर्षाला साडेतीन लाखांचे उत्पन्न वाढणार
लातूर : लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकातील विद्युत खांबावर विविध पक्ष संघटना तसेच खाजगी कोचिंग क्लासेसमार्फत जाहिरात फलक लावण्यात येतात़ आता मनपाने त्यासाठी दर आकारले असून, प्रति पोल हजार रूपये वार्षिक भाडे आकारले आहे़ या जाहिरातींच्या माध्यमातून वर्षाला ३ लाख ६१ हजार ५३६ रूपये उत्पन्न मिळविण्याचा मनपाचा मानस आहे़ त्यादृष्टीने स्थायी समितीच्या बैठकीत जाहिरातीचे दर निश्चित करण्यात आले आहेत़ यापुढे एकाही पोलवर विनाशुल्क जाहिरात लागणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत़
लातूर शहरातील गरूड चौक ते पाच नंबर चौक आणि राजीव गांधी चौक ते रेणापूर चौक तसेच राजीव गांधी चौक ते गरूड चौकापर्यंत मनपाचे २६९ पोल आहेत़ दुभाजकातील पोलवर जाहिरात करण्यासाठी मनपाने भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रति पोलि १ हजार रूपये वार्षिक भाडे आकारण्यात आले आहे़ मनपाकडे नोंदणी केल्यानंतरच या पोलवर फलक लावता येणार आहेत़ ३ बाय ४ चौरस फुटाचा बोर्ड या पोलवर लावता येईल़ न्यायाल्याने घालून दिलेल्या नियम व अटींना अधिन राहून मनपाच्या स्थायी समितीने उत्पन्नवाढीसाठी हा निर्णय घेतला आहे़
कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्ष जाहिरात करण्यासाठी २६९ पोल दिले जातील़ एका पोलवर दोन्ही बाजुने जाहिरात करण्यासाठी प्रति महिना ६६२ रूपये व वार्षिक भाडे १३४४ रूपये होते़ तर वार्षिक भाडे ३ लाख ६१ हजार ५५६ रूपये होतात़ तीन वर्षासाठी दिले तर १० लाख ८४ हजार ६०८ रूपये होते़ या दरात आणखीन वाढ करण्याचे नियोजन आहे़
सद्य:स्थितीत प्रस्तुत दरानुसार मनपाला उत्पन्न अपेक्षित असून, यासंदर्भात जाहिरात निविदा मागविण्यात येत आहेत़ तसा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला असून यातून मनपाला चांगले उत्तन्न मिळेल, सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)