उत्पन्नाची मर्यादा ६ लाख
By Admin | Updated: July 27, 2014 01:16 IST2014-07-27T00:42:59+5:302014-07-27T01:16:18+5:30
अर्धापूर : शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घेतला. ६ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

उत्पन्नाची मर्यादा ६ लाख
अर्धापूर : शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घेतला. ६ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. शासकीय, निमशासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थामध्ये या प्रवर्गास आरक्षणाचा लाभ घेता येईल. हे आरक्षण उन्नत व प्रगत घटकांना लागू होणार नाही. या प्रवर्गाला इतर मागासवर्गीयांप्रमाणेच राजकीय आरक्षण वगळता सर्व सोयी प्राप्त होणार आहेत. हे आरक्षण ९ अधिसूचित विभागांना व पदांना लागू होणार नाही.
शासकीय व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शालेय शिक्षण उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य शिक्षण, कृषी शिक्षण या विभागाअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी १६ टक्के आरक्षण लागू राहील. मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा तहसीलदारांचा दाखला, जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून मिळणारे जातवैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र अनिवार्य राहील. हे प्रमाणपत्र कसे मिळवावे याबाबतची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही कागदपत्रे विशेष कार्यकारी अधिकारी, राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेली असावी. दहावी व बारावीचे गुणपत्रक, बोर्ड सर्टीफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, शिधापत्रिकेचे पहिले व शेवटचे पान, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, गावातील वर्ष व त्यापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांचा रहिवासी दाखला किंवा मागील वर्षाचे वास्तव्य सिद्ध करणारी वीजबिले, उतारे, मालमत्ता कर पावत्या आदी कागदपत्रे अनिवार्य राहील.
गाव कामगार तलाठी यांच्याकडून कुटुंबप्रमुख, शिधापत्रिका प्रमुखाच्या नावे मागील एक आणि तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र किंवा वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. (वार्ताहर)
परराज्यातील व्यक्तींनाही अटी
अर्जदार हे परराज्यातील असतील तर त्यांच्यासाठीही काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वीस वर्षांपासूनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा मालमत्तेचे कार्ड, जमीन असेल तर खरेदी खत, कर पावत्या सादर कराव्या लागणार आहेत. विवाहित स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास विवाहानंतरचे पुरावे म्हणून पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचे पुरावे, विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात प्रसिद्ध झालेला नावातील बदल किंवा लग्नपत्रिका किंवा पोलिस पाटील यांचा दाखला, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना लागणार आहे.