जाधववाडी, मुकुंदवाडीत घरफोडीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:29+5:302021-02-05T04:20:29+5:30
औरंगाबाद : नवा मोंढा जाधववाडी आणि मुकुंदवाडी परिसरातील घर फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या. ...

जाधववाडी, मुकुंदवाडीत घरफोडीच्या घटना
औरंगाबाद : नवा मोंढा जाधववाडी आणि मुकुंदवाडी परिसरातील घर फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या. जाधववाडीत चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. प्राप्त माहिती अशी की, मुकुंदवाडीतील एक महिला १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी फर्दापूर येथे सहकुटुंब गेली होती. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडले. गॅस सिलिंडर, धान्याचे तीन पोते, तीन हजारांच्या साड्या आणि बचत गटाचे एटीएम कार्ड चोरट्यांनी पळविले. महिलेने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली.
अन्य एका घटनेत जाधववाडीतील प्रकाश कडुबा जगताप (वय ६०, रा. गोकुळनगर) हे २९ जानेवारीला बाहेरगावी गेले होते. चोरट्यानी संधी साधून भरदिवसा त्यांच्या घराचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याविषयी जगताप यांची तक्रार प्राप्त होताच हर्सूल पोलिसांनी संशयित आरोपी सय्यद सत्तार सय्यद सिकंदर (३०, रा. कादर कॉलनी, मिसारवाडी) याला अटक केली.