वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By Admin | Updated: October 15, 2016 01:23 IST2016-10-15T01:13:57+5:302016-10-15T01:23:02+5:30

औरंगाबाद : चार वर्षांच्या खंडानंतर बहुप्रतीक्षित वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.

Inauguration of the Venus-Ajanta Festival | वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे थाटात उद्घाटन


औरंगाबाद : चार वर्षांच्या खंडानंतर बहुप्रतीक्षित वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.
वेरूळ लेणीच्या साक्षीने दीप प्रज्वलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची तेजोमय सुरुवात केली. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव वल्सा नायर, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, आ. प्रशांत बंब, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, पुढील वर्ष हे ‘व्हिजिट महाराष्ट्र- २०१७’ साजरे करण्यात येणार आहे. देश-विदेशातील जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात यावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच राज्याच्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतील पर्यटनाच्या व्यवसायाला गती देण्यासाठी येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच टुरिझम सर्किट करण्यात येणार आहे. पर्यटनाचे सहसंचालनालयाचे कार्यालय या शहरात आणण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मी चीन दौऱ्यावर असताना तेथील ‘ड्युन हाँग’ या शहरास भेट दिली. तेथे अजिंठ्यासारख्या लेण्या आहेत. तेथे अशी माहिती मिळाली की, औरंगाबादेतील अजिंठा लेणी पाहून १ हजार वर्षांपूर्वी एक व्यक्ती ‘ड्युन हाँग’ येथे आला व तेथील लोकांच्या सहकार्याने अजिंठ्यासारखी प्रतिकृती तयार केली. चीनने जोरदार मार्केटिंग करून तेथे पर्यटक वाढविले. मात्र, औरंगाबादेतील अजिंठा, वेरूळ लेणी अस्सल आहेत. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी मार्केटिंग तेवढ्याच ताकदीने करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. वेरूळ-अजिंठा या जागतिक वारसामुळे देशात दिल्ली, आग्रानंतर औरंगाबादची एकाच वेळी तुलना होते, असा गौरव करून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रास्ताविक केले. पर्यटनाची शृंखला आहे. पर्यटनाच्या विकासासाठी अतिथी देवो भव: चे वातावरण निर्माण झाले पाहिजे. यात रिक्षावाले, टॅक्सीवाले हे ब्रँड अ‍ॅम्बेसीडर असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, मपविमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज, महोत्सवाचे समन्यवक व महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे, पर्यटन विकास महामंडळाचे सहसंचालक सतीश सोनी, पारस बोथरा यांनी केले.

Web Title: Inauguration of the Venus-Ajanta Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.