अद्ययावत प्रशिक्षण केंद्राचे उद््घाटन
By Admin | Updated: September 17, 2014 01:14 IST2014-09-17T00:58:02+5:302014-09-17T01:14:53+5:30
औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या स्वयंचल अभियांत्रिकी विभागात दुचाकी वाहन देखभाल व दुरुस्ती क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाचा विकास करण्यासाठी अद्ययावत

अद्ययावत प्रशिक्षण केंद्राचे उद््घाटन
औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या स्वयंचल अभियांत्रिकी विभागात दुचाकी वाहन देखभाल व दुरुस्ती क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाचा विकास करण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्राचे मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले.
शासकीय तंत्रनिकेतन आणि यामाहा इंडिया मोटार कंपनी प्रा.लि. यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रात इयत्ता दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण युवक, युवतींना दुचाकी वाहन देखभाल, दुरुस्ती क्षेत्रातील अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगारक्षम बनविणे व आॅटोमोबाईल क्षेत्राची निरंतर वृद्धिंगत होणारी कौशल्यधारक मनुष्यबळाची गरज भागविणे, या दोन उद्देशांनी या केंद्राची स्थापना करण्यात आली.
यामाहा इंडिया मोटार कंपनी प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक मसाकी असानो, विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक महेश शिवणकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक सुनील रायठठ्ठा, रविंदर सिंग, रॉय कुरियन, प्राचार्य प्रशांत पट्टलवार उपस्थित होते. यावेळी मसाकी असानो म्हणाले की, देशातील पश्चिम विभागात सुरू होणारे हे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. उद्योगांचा विस्तार होत असताना कौशल्याची कमतरता आहे. त्यामुळे अकुशल युवक बेरोजगारीकडे ढकलले जात आहेत.
दुचाकी दुरुस्ती व देखभालीचा रोजगार प्रधान प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून एक व्यासपीठ देण्यात आले आहे. प्रा. गणेश दळवी यांनी अभ्यासक्रमासंबंधी माहिती दिली. उद्घाटनप्रसंगी राजेश अघाव, एस.पी. शिराळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
बदलत्या काळात महिलांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. या प्रशिक्षण केंद्रात युवकांबरोबर युवतींनीही प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या दुचाकी वाहन व दुरुस्ती, आॅटोमोबाईल या क्षेत्रातही त्या आता ठसा उमटवत आहेत.