स्मार्ट सिटीझन मोहिमेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:21+5:302021-02-05T04:16:21+5:30
औरंगाबाद : शहरातील नागरिकांना स्मार्ट सिटीझन म्हणून प्रशिक्षित करून त्यांना मान्यता देण्यासाठी मेगा पब्लिक अभियान असलेल्या स्मार्ट सिटीझन मोहिमेचे ...

स्मार्ट सिटीझन मोहिमेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
औरंगाबाद : शहरातील नागरिकांना स्मार्ट सिटीझन म्हणून प्रशिक्षित करून त्यांना मान्यता देण्यासाठी मेगा पब्लिक अभियान असलेल्या स्मार्ट सिटीझन मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपाधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील आदी उपस्थित होते.
महानगरपालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) महात्मा गांधी मिशन (एमजीएम) हॉस्पिटल आणि औरंगाबाद फर्स्ट या संस्थांनी संयुक्तपणे ही मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेविषयी बोलताना मनपा प्रशासक तथा एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणे हे केवळ पायाभूत विकासापुरते मर्यादित नाही. प्रत्येक नागरिक जबाबदारीने, चतुरपणे वागल्याशिवाय शहर स्मार्ट बनू शकत नाही. शहराच्या विकासामध्ये नागरिकांचा सहभाग घेतल्याशिवाय विविध विकासात्मक प्रकल्पांना फारसे महत्त्व प्राप्त होणार नाही. म्हणूनच आम्ही नागरिकांना शिक्षित करण्यासाठी, स्मार्ट बनविण्यासाठी एमजीएम हॉस्पिटल आणि औरंगाबाद फर्स्ट यांच्या मदतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने औरंगाबादेतील उद्योग, स्वयंसेवी संस्था, नागरिक गट, शैक्षणिक संस्थांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीविषयी सादरीकरण डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी केले.
औरंगाबाद फर्स्ट नागरिकांची नोंदणी आणि एमजीएमसोबत समन्वय ठेवेल. एमजीएम रुग्णालय प्रशिक्षण, प्रशिक्षण पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळ पुरविणार आहे. मनपा या मोहिमेची नोडल एजन्सी असून, स्मार्ट सिटीजन म्हणून प्रमाणपत्र देणारी संस्था असेल. स्मार्ट सिटीचे सामान्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कारखाने, विविध संस्था व संघटना, बँका, सामाजिक गट या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.