अतिक्रमणधारकांना अभय
By Admin | Updated: November 7, 2014 00:52 IST2014-11-07T00:34:58+5:302014-11-07T00:52:27+5:30
वाळूज महानगर : बजाजनगर या कामगार वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालले असून, अतिक्रमण हटविण्यास एमआयडीसी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.

अतिक्रमणधारकांना अभय
वाळूज महानगर : बजाजनगर या कामगार वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालले असून, अतिक्रमण हटविण्यास एमआयडीसी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. यामुळे अतिक्रमणधारकांना प्रशासन अभय देत असल्याची ओरड सुरू आहे.
बजाजनगरची लोकसंख्या झपाट्याने वाढतच चालली असून, या भागातील मुख्य चौकात व रस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक व वाहनधारकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येथील महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी चौक, एफडीसी चौक, मीनाताई ठाकरे मार्केट, मोरे चौक, लोकमान्य चौक, वडगाव रोड, कोलगेट चौक आदी ठिकाणी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. या मुख्य चौकात अतिक्रमण वाढल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक, नागरिक, विद्यार्थी व कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची सतत कोंडी होत असून, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुख्य रस्ते व चौकच नव्हे तर अतिक्रमणधारकांनी फुटपाथचाही कब्जा घेतल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना चांगलीच कसरत करावी लागत आहेत. पूर्वी एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी एमआयडीसीच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. आता सुरक्षारक्षक गायब झाल्यामुळे अतिक्रमणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रणधारकही निर्धास्त झाले आहेत. या वाढत्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याऐवजी एमआयडीसी प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
बजाजनगरात अतिक्रमणधारकांना एमआयडीसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्यामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होत चालली आहे. आरक्षित भूखंड, हरित पट्टे व मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणधारकांकडून ‘मलई’ मिळत असल्यामुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.