सिडको-हडकोत उद्यापासून पाडापाडी; महापालिका दोन टप्प्यात काढणार अतिक्रमणे
By मुजीब देवणीकर | Updated: March 1, 2023 18:58 IST2023-03-01T18:57:36+5:302023-03-01T18:58:11+5:30
सिडको-हडकोतील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सिडको-हडकोत उद्यापासून पाडापाडी; महापालिका दोन टप्प्यात काढणार अतिक्रमणे
छत्रपती संभाजीनगर : सिडको-हडको भागातील अतिक्रमणे २ मार्चपासून काढण्यात येणार आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागासोबत विद्युत विभागाचे पथकही राहणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्ते, फुटपाथ, ग्रीन बेल्टवरील अतिक्रमणे काढण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात ओपन स्पेस, नागरिकांच्या सोयीसुविधांच्या जागांवरील अतिक्रमणे काढली जातील.
सिडको-हडकोतील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने यापूर्वीच अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने अतिक्रमणे काढण्यासाठी अगोदर सेक्टरनिहाय म्हणजेच सिडको एन-१ ते एन-१३ आणि व्यापारी भागासाठी दोन असे १५ अधिकारी नियुक्त केले. अधिकाऱ्यांनी अतिक्रमणांचे सर्वेक्षण केले. या प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. खंडपीठाने महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड लावला. जी-२० परिषद सुरू होण्यापूर्वीच मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २ मार्चपासून सिडको-हडकोतील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केली होती. गुरुवारी सकाळपासून प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात होणार आहे.