वसुलीची मोहीम राबवूनही चार वर्षांत शून्य वसुली !
By Admin | Updated: April 29, 2015 00:54 IST2015-04-29T00:39:31+5:302015-04-29T00:54:06+5:30
हणमंत गायकवाड , लातूर वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात कर्जाची वसुली थकीत आहे़ गेल्या ४ वर्षात ५ कोटी ५६ लाखांच्या कर्जातून १

वसुलीची मोहीम राबवूनही चार वर्षांत शून्य वसुली !
हणमंत गायकवाड , लातूर
वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात कर्जाची वसुली थकीत आहे़ गेल्या ४ वर्षात ५ कोटी ५६ लाखांच्या कर्जातून १ रुपयाचीही वसुली लाभार्थ्यांकडून झाली नाही़ महामंडळाच्या २५१ कर्ज प्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिल्याचे उघडकीस आले असून, कर्जमाफीमुळे दोनदा कर्ज एकाच व्यक्तीला दिल्या दावा महामंडळाने केला असला तरी वसुली बाबत महामंडळ बेफिकीर आहे़
राज्यशासनाने २००८ पूर्वीच्या लाभार्थ्यांचे कर्ज माफ केले़ त्यामुळे वसुली केली नसल्याचे महामंडळ सांगत आहे़ मात्र २०१० नंतरही वाटप केलेल्या ८८४ लाभार्थ्यांकडून वसुली करण्यात आली नाही़ १ जानेवारी २०१० ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत या ८८४ लाभार्थ्यांना ५ कोटी ५६ लाख रुपये वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज वितरीत केले आहेत़ मात्र यात एका रुपयाचीही वसुली करण्यात आली नाही़ यामुळे महामंडळाचा उद्देश असफल होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केला आहे़ महामंडळाच्या स्थानिक कर्मचाऱ्याने एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज, एकाच व्यक्तीची जात वेगळी, धनादेश क्रमांकामध्ये व रक्कमेमध्ये फरक असे प्रकार केले आहेत़ त्यामुळेच वसुली नसल्याचे भाईकट्टी यांचे म्हणणे आहे़ माहितीच्या अधिकारातही स्थानिक कार्यालयातून माहिती दिली जात नाही़ महामंडळाच्या मुंबई कार्यालयातून माहितीच्या अधिकारात माहिती घ्यावी लागत आहे़ गेल्या ४ वर्षांत ५ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असताना वसुली का होत नाही, असा सावालही भाईकट्टी यांनी उपस्थित केला आहे़ वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयात कर्ज वितरीत केलेले प्रस्ताव आहेत़ मात्र थकीत लाभार्थ्यांना नोटिसा नाहीत़ वसुलीसाठी मोहीम नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज थकले आहे़ याला कर्मचारीच जबाबदार आहेत़ आता जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून, त्यांनी प्रादेशिक व्यवस्थापकांना आमच्या तक्रारीनुसार नमुद विसंगतीच्या अनुषंगाने मुद्देनिहाय चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याचे भाईकट्टी यांनी सांगितले़प्रादेशिक व्यवस्थापकांकडून आता काय चौकशी होते, याकडे लक्ष लागले आहे.