महत्त्वाचे प्रकल्प दिल्लीत रखडले!
By Admin | Updated: June 19, 2017 00:39 IST2017-06-19T00:23:14+5:302017-06-19T00:39:30+5:30
औरंगाबाद : नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागला आहे.

महत्त्वाचे प्रकल्प दिल्लीत रखडले!
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागला आहे. प्रस्तावित कामे बीओटीवर करायची की, ईपीसीवर याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ती कामे सध्या कागदावरच अडकून पडल्याची माहिती विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) आणि ईपीसी (इंजिनिअरिंग प्रॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन्स) यापैकी कोणत्या पर्यायाने ती कामे करायची यासाठी एनएचएआयच्या नागपूर विभागीय कार्यालयात वारंवार बैठकीचे सत्र सुरू आहे. परंतु त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. ईपीसीमध्ये कंत्राटदार डिझाईनपासून बांधकामांपर्यंत सर्व कामे करतो. ती बीओटीमध्ये टोल वसुली करण्याचा प्रकार असतो.
खाजगीकरणातून प्रकल्पनिर्मिती होते. राज्यातील अकोला, नागपूर, खामगाव, सोलापूर, औरंगाबादमधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय होत नसल्याने ती कामे रेंगाळली आहेत.
औरंगाबादमधील जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरणाच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या कामांचा डीपीआर देऊन वर्ष होत आले आहे. त्या कामाला मंजुरी देण्यात आली असली तरी निविदा प्रक्रियेकडे ती कामे सरकलेली नाहीत. मध्यंतरी एनएचएआयने काही कामांच्या बीओटीच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अॅन्युटीवर निविदा प्रसिद्धीस दिल्या. परंतु अॅन्युटीच्या निविदांनादेखील प्रतिसाद मिळाला नाही. एक निविदा आल्यामुळे पुन्हा निविदा मागविण्याची वेळ आली.