महत्वपूर्ण संचिका धोक्यात

By Admin | Updated: July 26, 2014 00:42 IST2014-07-25T23:48:12+5:302014-07-26T00:42:22+5:30

चंद्रकांत देवणे, वसमत तालुक्याचे सर्व दप्तर व सर्व शेतकऱ्यांची कुंडली असलेले तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील दप्तर रामभरोसेच आहे.

Important file threats | महत्वपूर्ण संचिका धोक्यात

महत्वपूर्ण संचिका धोक्यात

चंद्रकांत देवणे, वसमत
तालुक्याचे सर्व दप्तर व सर्व शेतकऱ्यांची कुंडली असलेले तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील दप्तर रामभरोसेच आहे. जर आग लागली तर आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था या कार्यालयात नाही. या कार्यालयासह नव्याने बांधलेल्या तहसील व उपविभागीय कार्यालयातही अद्यापही यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.
वसमत शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील आग प्रतिबंधक उपाय योजनांचा गुरूवारी आढावा घेतला असता खासगी बँका वगळता इतर शासकीय कार्यालयात आगरोधक यंत्रणाच नसल्याचे पहावयास मिळाले. शहरातील हैदराबाद बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, नगर पालिका या कार्यालयात आग प्रतिबंधक यंत्रणा पहावयास मिळाली. खाजगी कार्यालयात ही यंत्रणा उपलब्ध आहे. शहरातील खाजगी कार्यालयात मात्र ही यंत्रणा पहावयास मिळाली नाही.
वसमत शहराच्या भर बाजारात तालुका भूमीलेख कार्यालय आहे. २००६ पासून हे कार्यालय या इमारतीत सुरू आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे व तालुक्याची सर्व कुंडली कागदपत्राच्या निमित्ताने या कार्यालयात जतन केली आहे. कार्यालयाच्या दप्तररुममध्ये कापडी गठ्ठ्यात कागदपत्रे बांधून ठेवलेली आहेत. मात्र या कागदपत्रांची सुरक्षा व्यवस्था मात्र काहीही नाही. जर आग लागली तर आग विझविण्याचीही कोणतीही यंत्रणा नाही.
नगरपालिकेचा अग्निशमन बंब येईपर्यंत कागदपत्रे आगीपासून शाबूत राहावीत यासाठी राम नामाचा जपच करावा लागेल, अशी अवस्था आहे. रेकॉर्डरुममध्ये लाईट फिटींगही उघडी आहे. शॉर्टसर्कीटमुळे कधीही दुर्घटना होवू शकते. आजवर काही झाले नाही हे नशीब. परंतु भविष्यात जर साधी ठिणगीही पडली तर रेकॉर्ड सांभाळणेही अवघड होणार आहे.
या संदर्भात तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक देशमुख यांच्याशी चर्चा केली असता, आग विझविण्यासाठीचे यंत्र शासनाकडूनच सर्व कार्यालयांना दिले जाते. वसमतच्या कार्यालयाला अद्याप ही यंत्रसामुग्री मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
वसमत येथे नव्याने तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या आहेत. या कार्यालयातही महत्वाचे दस्तावेज व कागदपत्र रेकॉर्ड रुममध्ये असतात. मात्र या दोन्ही कार्यालयातही आगरोधक यंत्रणाच नाही. या संदर्भात तहसीलदार अरविंद नरसीकर यांच्याशी संपर्क साधला असता, रेकॉर्ड रुमसाठी आगरोधक यंत्रणा आवश्यक आहे. तशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे. लवकरच ही यंत्रणा प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वसमत येथील रेकॉर्ड रुमचे उद्घाटन पंधरा दिवसापूर्वीच विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्तांनीही रेकॉर्ड रुमसाठी आगरोधक यंत्रणा तातडीने बसवून घेण्याची सूचना केली होती. (वार्ताहर)
सुरक्षितता वाऱ्यावर
वसमत तालुक्याचे सर्व दप्तर व शेतकऱ्यांची कुंडली असलेले तालुका भूमिअभिलेख कार्यालय रामभरोसेच आहे.
आग लागली तर आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था या कार्यालयात नाही.
नव्याने बांधलेल्या तहसील व उपविभागीय कार्यालयातही अग्निशामक यंत्रणा नाही.
वसमत शहरातील हैदराबाद बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, नगरपालिका या कार्यालयात आग प्रतिबंधक यंत्रणा पहावयास मिळाली.
वसमत शहराच्या भर बाजारात तालुका भूमीलेख कार्यालय आहे. २००६ पासून हे कार्यालय या इमारतीत आहे.
कार्यालयाच्या दप्तर रुममध्ये कापडी गठ्ठ्यात कागदपत्रे बांधून ठेवलेली आहेत. मात्र या कागदपत्रांची सुरक्षा व्यवस्था मात्र काहीही नाही. जर आग लागली तर आग विझविण्याचीही कोणतीही यंत्रणा नाही.
विभागीय आयुक्तांनीही आगरोधक यंत्रणा तातडीने बसवून घेण्याची सूचना केली होती.

Web Title: Important file threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.