नेत्रविभागात अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित
By Admin | Updated: October 1, 2014 00:48 IST2014-10-01T00:48:10+5:302014-10-01T00:48:10+5:30
उस्मानाबाद : खराब झालेली योग्लेझर मशीन आणि पेरिमीटर मशीन उपलब्ध नसल्याने काचबिंदूच्या रूग्णांना तपासणीसाठी परजिल्ह्यातील खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत होती़

नेत्रविभागात अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित
उस्मानाबाद : खराब झालेली योग्लेझर मशीन आणि पेरिमीटर मशीन उपलब्ध नसल्याने काचबिंदूच्या रूग्णांना तपासणीसाठी परजिल्ह्यातील खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत होती़ आरोग्य विभागाकडून या दोन्ही यंत्रणा जिल्हा रूग्णालयातील नेत्र विभागाला उपलब्ध करून दिल्या असून, त्यामुळे रूग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे़
जिल्हा रूग्णालयाच्या कारभाराबाबत रूग्णांकडून होणारी ओरड तशी नवी नाही़ मात्र, जिल्हा रूग्णालयातील नेत्र विभागाने आपल्या कामगिरीच्या बळावर राज्यस्तरीय पुरस्कार पटकाविला आहे़ या विभागाने शासनाकडून आलेले विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले असून, नेत्रदानासाठीही जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे़ या विभागातील याग्लेझर ही यंत्रणा खराब झाल्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरच्या तपासण्या आणि शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती़ तर पेरिमीटर ही यंत्रणा नसल्याने काचबिंदू असलेल्या रूग्णांच्या आजाराचे प्रमाण इथे तपासता येत नव्हते़ त्यामुळे काचबिंदूच्या रूग्णांना शेजारील लातूर, सोलापूर आदी ठिकाणी जावून काचबिंदूच्या आजाराची तीव्रता तपासावी लागत होती़
काही दिवसांपूर्वी शासनाच्या आरोग्य विभागाकडून या दोन्ही यंत्रणा जिल्हा रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील काचबिंदू असलेल्या नेत्र रूग्णांसह मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काही वेळा डोळ्याच्या पडद्यावर येणारी जाळी काढण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे़
रूग्णांनी लाभ घ्यावा
जिल्हा रूग्णालयात पेरिमीटर यंत्रणा नसल्याने नेत्र रूग्णांमध्ये असलेले काचबिंदूचे प्रमाण तपासता येत नव्हते़ काही दिवसांपूर्वी ही यंत्रणा नेत्र विभागात आली आहे़ त्यामुळे काचबिंदूची तपासणी करणे सोईस्कर झाले असून, रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, तसेच अधिकाधिक संख्येने नेत्रदान करावे, असे आवाहन नेत्र विभागाचे शल्यचिकित्सक डॉ़ मिलिंद पौळ यांनी केले़ (प्रतिनिधी)