खासगी उद्योगांमध्येही राबवा आरक्षण धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:02 IST2021-07-21T04:02:07+5:302021-07-21T04:02:07+5:30
औरंगाबाद : खासगी उद्योगांमध्येही राखीव जागांचे धोरण लागू करण्याचे आदेश आपल्या पंतप्रधानांना द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी ...

खासगी उद्योगांमध्येही राबवा आरक्षण धोरण
औरंगाबाद : खासगी उद्योगांमध्येही राखीव जागांचे धोरण लागू करण्याचे आदेश आपल्या पंतप्रधानांना द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी एका पत्राद्वारे सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांच्याकडे केली आहे.
डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण अत्यंत विवेकी आणि द्रष्टे सरसंघचालक आहात. या देशातील नागरिक आणि राष्ट्राची जी काळजी वाटते, ते स्मरून देशाचा विध्वंस होऊ नये आणि देशात अराजकता माजू नये म्हणूनच हा पत्रप्रपंच करत आहे. मध्यंतरी आपण संविधानातील ‘सामाजिक न्याय’ हे तत्त्व समोर ठेवून घेतलेली भूमिका न्यायोचित आहे. आपण म्हणाला होतात की, ‘जोपर्यंत शेवटचा घटक मला आता आरक्षण नको म्हणत नाही, तोपर्यंत आरक्षण सुरूच राहील, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र, आपल्या पंतप्रधानांनी अनेक विभागांचे खासगीकरण करून राखीव जागांची तरतूद बेचिराख केली आहे. एकीकडे आपली सामाजिक न्यायाची भूमिका आणि दुसरीकडे त्याविराेधात पंतप्रधानांची कृती, याला आम्ही आपला अपमान समजावे का? सरसंघचालकांच्या भूमिकेविराेधात जाण्याचे पंतप्रधानांचे धाडस झालेच कसे, हे आश्चर्यकारक आहे.
मागासवर्गीय (एससी), अतिमागासवर्गीय (एसटी) आणि विशेष मागासवर्गीय (ओबीसी, डीएनटी, व्हीजेएनटी) यांच्या शैक्षणिक आणि नोकरीविषयक सोयी-सवलती काढल्यास पुढील काळात अराजकता जन्माला येऊ शकते. सामाजिक गुलामगिरी पुन्हा लादण्याची जर कोणी स्वप्न रंगवित असेल, तर ते काचेच्या घरात राहत आहेत, असे समजले पाहिजे.