उमरीत मटका जुगाराला राजाश्रय
By Admin | Updated: September 14, 2014 23:36 IST2014-09-14T23:34:20+5:302014-09-14T23:36:54+5:30
उमरी : बदलत्या राजकीय स्थितीनुसार मटका तसेच जुगारचालक राजकीय पुढाऱ्यांशी व पक्षांशी जुळवून घेतात. राजकारणीसुद्धा आपल्या फायद्यासाठी पायघड घालण्याचा उद्योग करतात,

उमरीत मटका जुगाराला राजाश्रय
उमरी : बदलत्या राजकीय स्थितीनुसार मटका तसेच जुगारचालक राजकीय पुढाऱ्यांशी व पक्षांशी जुळवून घेतात. राजकारणीसुद्धा आपल्या फायद्यासाठी पायघड घालण्याचा उद्योग करतात, अशा विचित्र स्थितीमुळे पोलिस यंत्रणा हतबल होते व हे अवैध धंदे राजरोसपणे पुढे चालू राहतात.
उमरी शहरातील गेल्या काही वर्षांतील स्थानिक राजकारणावर दृष्टिक्षेप टाकल्यास या मटका चालकांनी दर पाच वर्षाला कशा कोलांटउड्या मारल्या याचा प्रत्यय येतो. शहरात जुगारचालकांचा एक मोठा कंपू कार्यरत असल्याने परिवारातील एक-ना- एकजण प्रत्येक वेळी राजकीय आश्रयाने पद बळकावून बसतो. शिवसेना, राष्ट्रवादी नंतर काँग्रेस असा यांचा प्रवास शहरातील राजकारणात चालू आहे. चलतीच्या मागे सतत जुळवून घेत ही मटकाचालक मंडळी आपले ईप्सित साध्य करण्यात यशस्वी ठरली. आजघडीला शहरात हा उद्योग अगदी व्यवस्थित चालू असून त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही़
राजकीय आश्रय असल्याने नेत्यांची रेलचेल त्यासाठी यंत्रणेची धावपळ आलीच. अशा विचित्र प्रकारामुळे पोलिस लगेच एखादे कारवाईचे पाऊल उचलण्यास कचरत असते. एका वेळी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग चव्हाण यांनी येथील मटका पूर्णपणे बंद करण्याचा चंग बांधला होता. तद्नंतरच्या काळात आलेल्या अधिकाऱ्यांनी मात्र पुढे यात रस दाखविला नाही. म्हणून अव्याहतपणे चालू असलेला शहरातील मटका आज वैध व्यवसायाचे स्वरुप घेत आहे.
परिणामी अनेक गरीब व अज्ञानी कुटुंब उघड्यावर पडल्याचे प्रकार होताना दिसतात. या अवैध व्यवसायाला पूर्णत: पायबंद घालण्यास जिल्हा पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. (वार्ताहर)
माहुरात जुगार अड्ड्यावर छापे
श्रीक्षेत्र माहूर : श्रीक्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मटका लावण्याच्या चिठ्ठ्या, रोख रकमेसह दोन पुरुषांसह एका महिलेवरही गुन्हा दाखल केला आहे़
माहूर तालुक्यात अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने मटका सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या़ त्यामुळे नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेने चिंचखेड येथे छापा टाकून रामराव टेकाम यास रंगेहाथ मटका घेताना पकडले होते़ तर माहूर शहरातही याच प्रकारे छुपा मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पारवेकरनगर येथे छापा टाकला असता कल्याण- मिलन नावाचा मटका घेताना दत्ता चोकराम मनवर, भाऊराव पाचकोरे, सविताबाई पाचकोरे यांच्यावर छापा टाकून ४६० रुपये व मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्यांसह पकडण्यात आले़ परंतु भाऊराव पाचकोरे व सविताबाई पाचकोरे फरार झाले आहेत़
माहूरच्या पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अवैध धंदे फोफावत असून पोलिसांनी अवैध हातभट्टीचालकांवर गुन्हे दाखल केले असून मोबाईलवर चालणाऱ्या जुगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेने माहूर तालुक्यावर दौरे वाढविल्यास छुप्या मटक्याच्या धंद्यावर अंकुश बसू शकतो़ त्याचबरोबर दारूविक्रीत महिलांचा सहभाग हा चिंतेचा विषय असताना मटका चालविण्यातही महिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत़
तालुक्यातील वानोळा, सिंदखेड, चिंचखेड, वाईबाजारसह शहरात हातभट्टीची दारू ‘ड्राय डे’ च्या दिवशी दारू विक्रीसह छुप्या मटक्याचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातल्या पिराजी गायकवाड, देवीदास चव्हाण, बळीराम दासरे यांनी धाड टाकून गुन्हा दाखल केला आहे़ अवैध धंदे थांबविण्याची नागरिकांतून मागणी होत आहे़ (वार्ताहर)