‘नराधमाला तात्काळ अटक करा..!’
By Admin | Updated: February 28, 2017 00:59 IST2017-02-28T00:57:50+5:302017-02-28T00:59:33+5:30
अंबाजोगाई :गिरवली येथे बलात्कार करुन फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करा. या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांचा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

‘नराधमाला तात्काळ अटक करा..!’
अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथे ७ फेब्रुवारी रोजी शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करा. या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांचा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तब्बल १२ किमीचे अंतर कापून मोर्चेकरी बैलगाड्यांसह शहरात दाखल झाले होते.
गिरीवली येथे शेतकाम करणाऱ्या महिलेवर गावातीलच बाळू शामराव काळे याने अत्याचार केला होता. सुरुवातीला विनयभंग व नंतर बलात्काराची फिर्याद बर्दापूर ठाण्यामध्ये नोंद झाली होती. तीन आठवडयाचा कालावधी उलटूनही आरोपी सापडत नसल्याने ग्रामस्थांनी सोमवारी गिरवली ते अंबाजोगाई असा १२ कि.मी. अंतराचा ‘नराधम प्रतिबंधक मोर्चा’ काढला. हा मोर्चा गिरवली सबस्टेशन, पिंपळा, शेपवाडी, भगवानबाबा चौक, अण्णा भाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, सावरकर चौक, शिवाजी चौकमार्गे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आरोपीला अटक करा..., महिलांना संरक्षण द्या... अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. गिरवली येथील ग्रामस्थ २५० बैलगाड्यांसह शहरात दाखल झाले. या मोर्चात कालिदास आपेट, प्रताप आपेट, विनोदकुमार बुरांडे, बळवंत बावणे, अॅड. माधव जाधव, गोविंद पोतंगले, दाजीसाहेब लोमटे, मनोज कदम, संजय आपेट, अॅड. अमित गिरवलकर, शैलेंद्र आपेट, यशवंत आपेट, केतन निसाले यांच्यासह ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन दिले. त्यांनी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच मोर्चेकरी शांत झाले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)