रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल

By Admin | Updated: November 11, 2016 00:33 IST2016-11-11T00:35:51+5:302016-11-11T00:33:23+5:30

कळंब पालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़

Imagery collecting collectors on wages | रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल

रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल

उन्मेष पाटील कळंब
पालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़ या प्रचारात गर्दीचे ‘ग्लॅमर’ लाभावे यासाठी काही उमेदवारांनी रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल लढविली आहे. या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिवसाकाठी ३०० रुपये रोजंदारी दिली जात आहे़
शहरात सध्या पालिका निवडणुकीची हवा गरम आहे. सर्वच पक्षांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. काही उत्साही उमेदवारांनी प्रशासनाने अधिकृतरीत्या चिन्ह वाटप करण्यापूर्वीच डिजिटल फलक लावण्याची घाई केली आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह कायमस्वरुपी असल्याने चिन्ह वितरित करण्याची वाट कशामुळे बघायची, असा प्रश्नही या उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला असला तरी सर्वांनाच कार्यकर्त्यांची वाणवा जाणवत आहे. गावपुढाऱ्यांनी ‘यूज अँड थ्रो’ भूमिकेने कार्यकर्त्यांचा वापर केल्याने कार्यकर्ते विशेषत: युवक मंडळी सध्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उतरल्याचे दिसून येत नाही. सत्तेचा लाभ काही मूठभरांना दिला जातो व निवडणुकीत कार्यकर्त्यांना जाती-धर्माच्या नावावर भावनिक ब्लॅकमेल केले जाते व त्यांचा केवळ वापर केला जातो असा सूर या युवकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळेच सर्वच प्रमुख पक्षांना सध्या सक्रिय कार्यकर्त्यांची कमतरता भासत आहे. यावर उपाय म्हणून आता भाडेतत्त्वावर कार्यकर्ते घेतले जाऊ लागले आहेत. महिलांसह नागरिकांना ३०० रुपये दररोज प्रचारासाठी देण्याची आॅफर काही उमेदवारांनी दिली आहे़ तर युवकांची संख्या वाढविण्यासाठी काही उमेदवारांनी ४०० ते ५०० रुपये देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या सिझननंतर मोलमजुरी करणाऱ्या महिलांना हा ‘इलेक्शन’ सिझन चांगलच लाभदायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभर प्रचार केल्यानंतर या प्रचारातील रोजंदारी कार्यकर्त्यांना भोजनाचीही व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा आहे. पाच वर्षे कार्यकर्त्यांना न सांभाळणाऱ्या पुढाऱ्यांवर कंत्राटी कार्यकर्ते घेण्याची वेळ आली असताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांकडे मात्र स्वखर्चाने प्रचारात उतरलेल्या कार्यकर्त्यांची चांगली फळी दिसून येत आहे. शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनीही या युवकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडून येईल, असा विश्वास या नवख्या उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Imagery collecting collectors on wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.