'अच्छे दिन'च्या जयघोषाचा भ्रमनिरास

By Admin | Updated: September 13, 2014 00:10 IST2014-09-12T23:58:15+5:302014-09-13T00:10:44+5:30

भोकर : अच्छे दिन म्हणून सत्तेत येणाऱ्या भाजपाबाबत जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे़

The illusion of 'good days' | 'अच्छे दिन'च्या जयघोषाचा भ्रमनिरास

'अच्छे दिन'च्या जयघोषाचा भ्रमनिरास

भोकर : अच्छे दिन म्हणून सत्तेत येणाऱ्या भाजपाबाबत जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे़ यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकणारच असा निर्धार माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथील युवा निर्धार मेळाव्यात केला़ यावेळी उपस्थित युवकांनी या निर्धाराचे टाळ्या वाजवून स्वागत केले़
रणछोडदास मंगल कार्यालयात पार पडलेल्या या युवा निर्धार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डी़पी़ सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून आ़अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी़आऱ कदम, शंकरराव देशमुख बारडकर, गणपतराव तिडके, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, केदार पाटील सोळुंके, माधवराव पाटील मातूळकर, माधव कदम, गोविंदराव नागेलीकर, केशव इंगोले, जगदीश पाटील भोसीकर, संजय देशमुख लहानकर, मंगाराणी अंबुलगेकर, नगराध्यक्षा शमीम बेगम, विनोद चिंचाळकर, साईनाथ पाटील गौड, संतोष पांडागळे, शोभा मुंगल, शिवाजी देवतुळे यांची प्रमुख उपस्थिती होती़
मेळाव्यात पुढे बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले, आतापर्यंत मी युवकांना संधी देण्याचे काम केले आहे़ युवकांनीही लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्याची शान राखत काँग्रेसला विजयी केले़ माझ्या घराण्याचा व नांदेड जिल्ह्यातील जनतेचा मागील ४० वर्षांपासून ऋणानुबंध आहे़ हा जिव्हाळा आणखी घट्ट होणार आहे़
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, सत्ता असो वा नसो, मी तुमच्या सोबत आहे़ भोकर विधानसभा मतदारसंघात सिंचनासाठी करोडो रुपयांचा निधी आणला़ मी दिल्लीत असलो तरी माझे मन मात्र येथील मातीत रमत राहते़ येथील समस्या सोडविण्याबाबत विचार घिरट्या घेत असते़ मागील लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण केले़ पण तुमची साथ मिळाल्याने मी पुन्हा जोमाने काम करीत आहे़ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊही उमेदवार निवडून येणार असा आत्मविश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला़ भोकर विधानसभा मतदारसंघात जनता म्हणेल तोच उमेदवार असणार आहे़ मी कोणतीही शिफारस करणार नाही़ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेला बांधील राहून प्रचार यंत्रणा हलवावी़ आपला विकास हवा असेल तर सत्तेत आपले शासन हवे आणि ही सत्ता येणारच असा निर्धार केला़ तुम्ही काँग्रेसचा पताका फडकावा, विकासाची हमी मी घेतो असेही ते म्हणाले़
'नमो नमो' ऐवजी आता 'नको नको' सुरू होईल
केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपाने सामान्य माणसांची घोर निराशा केली आहे़ यामुळे नमो नमो ऐवजी आता नको नको सुरू झाले आहे़ याचा फायदा घेत काँग्रेसला विजयी करा़ कारण युवक काँग्रेस पक्षाचा खरा कणा आहे, असे पालकमंत्री डी़पी़ सावंत म्हणाले़
अमिता चव्हाण यांनाच पसंती
भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमिता चव्हाण असावेत असा सूर या युवा निर्धार मेळाव्यात लागला़ आ़ अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, पप्पू पाटील कोंढेकर, शंकरराव बारडकर, संजय देशमुख लहानकर, बी़ आऱ कदम यांनी आपल्या भाषणात भाभींनाच उमेदवारी द्या अशी जोरदार मागणी केली़ प्रास्ताविक भोकर विधानसभा अध्यक्ष माधव कदम तर सूत्रसंचालन संजय कोलते यांनी केले़
(वार्ताहर)
लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार नव्हता़ मला जनतेच्या हट्टापायी ही निवडणूक लढवावी लागली़ कोणताही निर्णय मी जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय घेत नाही़ यामुळेच आपले नाते घट्ट आहे, असे सांगत ते म्हणाले, प्रश्न जनतेच्या इच्छेचा व उमेदवाराच्या निवडून येण्याच्या क्षमतेचा होता. नुकतेच लेबल बदललेल्यांनी मागील काही वर्षांपासून माझ्या मागे कोर्टकचेऱ्या लावल्या़ पण साईबाबांचा अन् आई-बाबांचा आशीर्वाद असल्याने सत्याचा विजय झाला असा टोला अशोकरावांनी विरोधकांना लगावला.

Web Title: The illusion of 'good days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.