अवैध वाहतूक; प्रवाशांची लूट
By Admin | Updated: March 26, 2016 23:49 IST2016-03-26T23:49:42+5:302016-03-26T23:49:42+5:30
वाळूज महानगर : शहर व एसटी बसेसची संख्या कमी असल्याचा फायदा घेत वाळूज परिसरात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे.

अवैध वाहतूक; प्रवाशांची लूट
वाळूज महानगर : शहर व एसटी बसेसची संख्या कमी असल्याचा फायदा घेत वाळूज परिसरात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांची लूट करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीत दररोज शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कामगार, विद्यार्थी व प्रवाशांची ये-जा सुरूअसते. एसटीच्या शहर बसेसला मोठी गर्दी राहत असल्यामुळे तसेच अनेक बस वाळूज व पंढरपुरात थांबत नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून प्रवास करावा लागतो.
अवैध वाहतूक करणारी मंडळी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी अनेक ठिकाणी अघोषित प्रवासी थांबे तयार केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवाशांना अक्षरश: ओढतच आपल्या वाहनात बसविण्याची त्यांच्यात स्पर्धा सुरूअसते. प्रवासी भरण्यावरून अनेकदा वाहनचालकांत भांडणे होत असतात. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना शुक्रवारी सुटी असते. या दिवशी अनेक कामगार कुटुंबियांसह शहरात जात असतात. तोकड्या बससेवेमुळे अनेकांना या खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो.