‘सर्वोपचार’च्या जागेत काळी-पिवळीचा अवैध थांबा
By Admin | Updated: November 16, 2014 23:38 IST2014-11-16T23:29:00+5:302014-11-16T23:38:45+5:30
लातूर : तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या परिसरात आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी वाहनांचा अवैध थांबा झाला आहे.

‘सर्वोपचार’च्या जागेत काळी-पिवळीचा अवैध थांबा
लातूर : तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या परिसरात आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी वाहनांचा अवैध थांबा झाला आहे. याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दुर्लक्ष असून, इमारत परिसरात तासन्तास ही वाहने थांबलेलीच असतात.
जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर स्त्री रुग्णालय व या रुग्णालयाची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाली. तेव्हापासून या जागेचा वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे. परंतु, सध्या तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या या जागेत ना दवाखाना ना रुग्णालय, अशी स्थिती आहे. परंतु, काळी-पिवळीच्या वाहनांची मात्र सोय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचा आंतर व बाह्यरुग्ण वॉर्ड होता. सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषध भांडार या इमारतीत आहे. महाविद्यालय प्रशासनाचे या इमारतीकडे दुर्लक्ष असल्यामुळे काळी-पिवळी वाहनांना मात्र रान मोकळे झाले आहे.
मध्यंतरी काही दिवस याच इमारतीत नर्सिंग महाविद्यालय चालविण्यात येत होते़ या महाविद्यालयातील संगणक चोरी झाल्यानंतर ही जागा रिकामी केली़ नर्सिंग महाविद्यालय हे आता वॉर्डामध्ये चालवण्यत येत आहे़ तेव्हापासून ही जागा रिकामीच आहे. दोन महिन्यापूर्वीच या जागेत आरोग्य विभागाने औषध भांडार सुरु करण्यात आले आहे़ ही जागा जरी सर्वोपचार रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मालकीची असली तरी, सद्य:स्थितीत आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे. काळी-पिवळी वाहनधारक बिनधास्तपणे याच ठिकाणावरुन प्रवासी घेतात. विशेष म्हणजे प्रवाशांनाही हा काळी-पिवळीचा परमंट थांबा माहीत झाला आहे. त्यामुळे जणू काही बसस्थानक असल्याचे समजून प्रवासीही जुन्या कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयात येतात. हा अनाधिकृत थांबा सार्वजनिक आरोग्य विभागाचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी दररोज पाहतात. मात्र त्यांना हा अनाधिकृत थांबा दिसत नसल्याचेच दिसते. (प्रतिनिधी)
या इमारतीच्या बाजूला पाच-दहा फुटांवरच जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यालय आहे. पूर्वी आरोग्य उपसंचालकांचे कार्यालय तेथे होते. आता जिल्हा शल्य चिकित्सकांना आणि पूर्वी आरोग्य उपसंचालकांनाही हा थांबा दिसला नाही. महाविद्यालयाला तर तो दिसतच नाही. विशेष म्हणजे ही जागा खाली करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाला वारंवार पत्र देते. परंतु, अवैध थांबाधारकांना मात्र साधी समजही ‘सर्वोपचार’कडून दिली जात नाही. त्यामुळे काळी-पिवळीधारक राजरोसपणे येथे थांबत आहेत.