बाबतारा शिवारात गोदावरी नदीच्या पात्रालगत गट नंबर ११ मधून माती उत्खनन सुरू आहे. या परिसरात सुरू असलेले खोदकाम हे अवैधरीत्या सुरू आहे. राॅयल्टी न भरता रात्रंदिवस माती चोरून नेली जात आहे. याबाबत महसूल व पोलीस विभाग मात्र अनभिज्ञ आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या माध्यमातून माती उपशाचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे गावकऱ्याकडून तलाठी व तहसील कार्यालयाला माहिती देण्यात आली. मात्र, तरीही अद्याप माती उत्खनन सुरू आहे. माती माफियांनी सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून माती उपशाचा सपाटा लावला आहे. शेतात जवळपास बाराफुटांपर्यंत खड्डे खोदले जात आहेत. परिणामी, गोदावरी पात्रालाही धोका निर्माण झाला आहे.
फोटो - कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बाबतारा शिवारात नदीपात्राच्या शेजारी असलेल्या गट नंबर अकरामधून जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस माती उपसा चालू आहे.