वाळूजमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: June 18, 2014 01:35 IST2014-06-18T01:21:10+5:302014-06-18T01:35:23+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.

वाळूजमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.
वाळूज औद्योगिक परिसरात शहर बसेसची संख्या नगण्य असल्यामुळे कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, अॅपेरिक्षा, रिक्षा यातून प्रवास करावा लागतो आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारे मनमानी करीत असून, एस.टी.च्या भाड्यापेक्षा जास्त भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे शहर तसेच ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार औद्योगिक परिसरात दररोज ये-जा करीत असतात. बस वेळेवर मिळत नसल्यामुळे कामगार प्रवाशांना नाइलाजास्तव खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरात ये-जा करीत असतात. मात्र, या मार्गावर कमी बसेस असल्यामुळे बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. बसमध्ये जागा मिळत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलींना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची भरपूर कमाई होत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून भरधाव वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे या मार्गावर अपघातही दिवसेंदिवस वाढत आहेत. औद्योगिक परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचालकांनी मुख्य चौकाचा ताबा घेऊन या ठिकाणी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. अॅपेरिक्षा व रिक्षा चालविणारे अनेक वाहनचालकअल्पवयीन असून, अनेकांकडे तर वाहन चालविण्याचा परवाना नाही.
अवैध वाहतुकीला अभय
या परिसरात अवैध वाहतूक बोकाळली असून, याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहे. चौकाचौकात काळी-पिवळी व अॅपेरिक्षात प्रवासी कोंबून बसविले जातात. वाहतूक पोलिसांसमोर अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. अवैध वाहनधारकांकडून वाहतूक शाखेतील काही कर्मचारी पैशांचे लाभार्थी असल्यामुळे ते कारवाई करीत नाहीत, असा आरोप सुरेश गाडेकर, सिद्राम पारे, बसगोंडा पाटील, नारायण हातोळे यांनी केला आहे.