पर्यटन नकाशावरील रेल्वेस्थानक दुर्लक्षित
By Admin | Updated: July 25, 2014 00:52 IST2014-07-25T00:51:20+5:302014-07-25T00:52:17+5:30
आंबा चोंढी : हिंगोली जिल्ह्यातील चोंढी रेल्वेस्थानक पुर्णा-अकोला मार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे.

पर्यटन नकाशावरील रेल्वेस्थानक दुर्लक्षित
आंबा चोंढी : हिंगोली जिल्ह्यातील चोंढी रेल्वेस्थानक पुर्णा-अकोला मार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे. विविध तीर्थक्षेत्रांमुळे देशातील पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या या रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सोयी-सुविधा देण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
चोंढी रेल्वेस्थानकाहून ज्योर्तिलींग औंढा नागनाथ, जैन मंदिर शिरडशहापूर, वाई येथील गोरखनाथ मंदिर, आंबा येथील भवानी मातेचे मंदीर तसेच अमरेश्वर महादेवाचे मंदिर जवळ आहे. त्याठिकाणचा कोल्हापूरी बंधारा गावकऱ्यांच्या वर्गणीतून उभारण्यात आलेला आहे. या मंदिराच्या पायथ्याशी काळाडोह नावाची जागा असून येथे आजही बेलाची पाने वाहत्या पाण्यात बुडाशी जातात, असे सांगितले जाते. तसेच भेंडेगाव येथील महानुभाव पंथाचे दत्त मंदिरही सर्वदूर प्रसिद्ध आहे. तेथे रेल्वे ट्रॅकसाठी भरपूर जागा आहे. नवीन ब्रॉडगेजचे काम सुरू असताना चोंढी येथून चाळीस डब्याच्या जवळपास दहा रेल्वे सोयाबीन चुऱ्याने भरून मुंबई येथे रवाना झाल्या. असे हे रेल्वे स्थानक आज दुर्लक्षित राहिले आहे. चोंढी येथील रेल्वे प्लॅटफॉर्म पुर्णपणे नादुरूस्त आहे. रेल्वेतून उतरताना पाय कोठे ठेवावा? असा प्रश्न पडतो. शिवाय तेथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांसाठी बांधलेले प्रसाधनगृह बंद अवस्थेत आहे. कोणत्याच प्रवाशांसाठी प्रतिक्षालय नाही. शिवाय तेथे घाण साचलेली असते. सगळीकडे केळांची सालपटे, शेंगाची टरफले, पाण्याचे रिकामे प्लॉस्टिक पाऊच, तयार खाद्यपदार्थांची रिकामी पाकीटे पडलेली असतात. रात्रीच्या वेळी तर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर फक्त दोन लाईट सुरू असतात. मागील मर्क्युरी बल्ब लावला जात नाही. तिकीट काढतेवेळी सुट्ट्या पैशांसाठी स्टेशन मास्तर व प्रवाशांदरम्यान तु-तु-मै-मै होत असल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळते. येथे रेल्वे कॅन्टीन नाही, रेल्वे येण्याची वेळ झाल्यास बेल वाजवली जात नाही. बिहार व उत्तर प्रदेशातील कर्मचारी मराठवाड्यातील जनतेला सापत्न वागणूक देतात. येथे संपूर्ण भारत वर्षात उत्तराखंड परिसरातील साधूंचे जत्थेच्या जत्थे पॅसेंजर रेल्वेने उतरतात. कोणत्याही लांब पल्ल्याच्या पॅसेंजर रेल्वे नाहीत. ‘ज्योर्तिलिंग औंढा नागनाथ के लिए यहाँ उतरिये’ असा बोर्ड लावलेला नाही. तर चोंढी स्थानकावर प्रवाशांची हेळसांड थांबवण्याची मागणी होत आहे. याठिकाणी सर्व सुविधा देऊन सिंकदराबादच्या जनरल मॅनेजरने येथील प्रवाशांची काळजी घ्यावी, अशी मागणी आंबा, चोंढी, शिरडशहापूर, कोर्टा, भेंडेगाव, महागाव, पांगरा बोखारे, वाई गोरखनाथ, कुरूंदा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)