मराठवाड्याच्या प्रश्नांकडे पुन्हा दुर्लक्ष

By Admin | Updated: July 9, 2014 00:11 IST2014-07-09T00:01:20+5:302014-07-09T00:11:28+5:30

नांदेड: नुतन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक नवीन गाडी वगळता मराठवाड्याच्या वाट्याला काहीही आले नाही़

Ignore Marathwada issues again | मराठवाड्याच्या प्रश्नांकडे पुन्हा दुर्लक्ष

मराठवाड्याच्या प्रश्नांकडे पुन्हा दुर्लक्ष

नांदेड: नुतन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक नवीन गाडी वगळता मराठवाड्याच्या वाट्याला काहीही आले नाही़ मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांकडे पुन्हा एकदा दूर्लक्ष झाल्याची प्रतिक्रिया मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव शंतनु डोईफोडे यांनी दिली़
नांदेडहून बिकानेरसाठी साप्ताहिक रेल्वे मिळाली़ तसे पाहिले तर मराठवाड्यासाठी ही एकमेव नवीन गाडी आहे़ नांदेड विभाग मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करणे, मुदखेड-परभणी लोहमार्गाचे दुहेरीकरण करणे या प्रमुख मागण्यांकडे लक्ष दिले नाही़ नांदेड-पुणे रेल्वेची वेळ गैरसोयीची आहे़ देवगिरी व नंदीग्राम एक्स्प्रेसला जादा डब्बे जोडण्याची आवश्यकता आहे़ औरंगाबाद ते चाळीसगाव व सोलापूर ते तुळजापुर या मार्गाच्या पाहणीची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली़ ही स्वागतार्ह बाब आहे़
मुदखेड ते परभणी दुहेरीकरण, नांदेड ते बिदर, नांदेड-वर्धा तसेच परळी-बीड-अहमदनगर या मार्गासाठी किती तरतुद केली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे़
दक्षिण मध्य रेल्वेच्या कचाट्यात सापडलेल्या नांदेड विभागाला मध्य रेल्वेला जोडणे तर काही गाड्यांचा पल्ला वाढविणे किंवा फेऱ्या वाढविणे यासारख्या मागण्या होत्या़ या अर्थसंकल्पात कामासाठी नेमकी किती तरतुद केली आहे, हे अद्यापि स्पष्ट झाले नाही़ नांदेड-बिदर, नांदेड - वर्धा या मार्गाबाबतही अशीच स्थिती आहे़ नव्या रेल्वेगाड्यांबाबतही फार काही वाट्याला आले नसल्याचे मराठवाड रेल्वे संघर्ष समितीचे बाबूभाई ठक्कर, डॉ़ पी़ डी़ जोशी पाटोदेकर, वसंत मैय्या, उमाकांत जोशी आदींनी म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
‘कृतीशील कार्यक्रम राबवावा लागेल’
रेल्वे मंत्रालयाकडून मराठवाड्यावर आजवर अन्यायच झाला़ पूर्वी जे मिळाले ते सुद्धा या अर्थसंकल्पात मिळाले नसल्याची प्रतिक्रिया मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी दिली़ रेल्वे अर्थसंकल्पात काही चूका अथवा उणिवा राहिल्यास त्या दुरुस्त करण्याची मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे़ परळी-बीड-अहमदनगर, वर्धा-नांदेड या मंजूर झालेल्या मार्गाच्या पूर्ततेसाठी निधी देवून कालबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण होईल अशी आशा बाळगावी काय? रोटेगाव-पुणतांबा, मुदखेड-मनमाड दुहेरीकरण, नांदेड विभाग द़ म़ रेल्वेतून मध्य रेल्वेला जोडणे आदी मागण्या हवेतच राहिल्या असे वाटते़ मराठवाड्याचा विकास होण्यासाठी मराठवाड्यातील सर्व खासदार, लोकप्रतिनिधींनी न्याय मागण्यांसाठी सजग राहून गंभीरतेने कृती कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे डॉ़ काब्दे म्हणाले़
नेहमीप्रमाणे बाजूला टाकले
हिंगोली-नांदेड-वर्धा-यवतमाळ -नांदेड हा मार्ग या बजेटमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु नेहमीप्रमाणे या मार्गाला बाजूला टाकले आहे. हा मार्ग झाला असता तर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असता. परंतु मराठवाड्याच्या तोंडाला मोदी सरकारने पाने पुसले.
माधवराव पाटील जवळगावकर (आमदार, हदगाव)
जनतेची घोर निराशाच़़़
आदिलाबाद-मुदखेड मार्गावर नव्या गाड्या सुरू होतील, किनवट-माहूर या मार्गाची अपेक्षा होती़ पण सादर करण्यात आलेल्या रेल्वे बजेटमध्ये कसल्याच प्रकारची तरतूद नाही़ यामुळे किनवट-माहूर तालुक्यातील जनतेची घोर निराशा झाली - आ़प्रदीप नाईक, किनवट-माहूर
कोणतीच नवीन गाडी नाही
चंद्रपूर-माहूर-किनवट या आदिवासी भागाचा संपर्क मराठवाड्याशी व्हावा म्हणून असलेल्या आदिलाबाद-मुदखेड लोहमार्गावर कोणतीच नवीन गाडी सुरू न करण्यात आली नाही़ - भीमराव केराम, माजी आमदार, किनवट
सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग
मोदींचे अच्छे दिन सरकार नसून बजेट सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही़ रेल्वे तिकीट वाढवून सर्वसामान्यांना न्याय मिळणारा नाही़ - विनायकराव कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष

Web Title: Ignore Marathwada issues again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.