वेरूळ लेण्यांकडे ‘पुरातत्व’ विभागाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 18, 2016 01:01 IST2016-04-18T01:01:58+5:302016-04-18T01:01:58+5:30
मुजीब देवणीकर, औरंगाबाद भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३ मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.

वेरूळ लेण्यांकडे ‘पुरातत्व’ विभागाचे दुर्लक्ष
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३ मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. वेरूळच्या लेण्या आजही संपूर्ण जगाला मोहिनी घालत आहेत. दरवर्षी सुमारे ४० लाखांहून अधिक देशी- विदेशी पर्यटक ऐतिहासिक औरंगाबादेत दाखल होतात. शहरात आलेला पर्यटक हमखास वेरूळ लेण्या पाहतोच. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध वारसाची दुरवस्था होत चालली आहे.
औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ गाव वसले आहे. सरळ रेषेत वसलेल्या एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने, प्रार्थना गृहे, विहार किंवा आश्रम, तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे. पाचव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत लेण्या कोरण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून लेण्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. लेण्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे अजिबात लक्ष दिल्या जात नाही. अनमोल मूर्तीच्या सुरक्षेसाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वी एका चित्रपटाची शूटिंग लेण्यांच्या परिसरात करण्यात आली. कलाकार लेण्यांमधील विविध मूर्र्तींवर बसून शॉट देत होते. त्यापूर्वी लेण्याच्या परिसरात अवैध उपाहारगृह चालविण्यात येत होते. उपाहारगृहात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. या स्फोटामुळे लेण्यांना तडा गेल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता.
जागतिक वारसा दिनानिमित्त वेरूळ लेणीत ‘लोकमत’प्रतिनिधीने फेरफटका मारला असता अत्यंत विदारक चित्र जिकडे तिकडे पाहायला मिळाले. अनेक मूर्र्तींची तोडफोड करण्यात आली आहे. दगडांची हळूहळू झीज होऊन ते कोसळत आहेत. ३४ लेण्यांमधील अनेक मूर्र्तींचे हात-पाय गायब झाले आहेत. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळील मोठ्या हत्तींचीही तोडफोड करण्यात आली आहे.
दगडांची पडझड होऊ नये यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून कोणत्याही खास उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
दौलताबाद, अजिंठा, वेरूळ, खुलताबाद, पाणचक्की कुठेही पर्यटकांनी पाय ठेवला तर अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळते. अनेक पर्यटनस्थळांवर तर पर्यटकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी घोटभर पाणी मिळत नाही. शहरातील पर्यटनस्थळ पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी यावे तरी कसे, असा प्रश्न अनेकांना पडतो. जनशताब्दी ही एकमेव रेल्वे सोडली तर पर्यटकांना सोयीची एकही रेल्वे नाही. शहरात आलेले पर्यटक एक ते दीड दिवस थांबतात. त्यानंतर ते अन्य शहरांतील पर्यटनस्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढावा यासाठी ठोस असे प्रयत्नच झालेले नाहीत.
वेरूळ, अजिंठा व इतर पर्यटनस्थळांची सोयीस्करपणे वाट लावण्याचे काम केंद्रीय पुरातत्व, राज्य पुरातत्व आणि एमटीडीसी करीत आहे. पर्यटन वाढावे यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. अनमोल वारसा जपण्यासाठी फारसे परिश्रम शासकीय यंत्रणांकडून घेतले जात नाही. त्यामुळे वेरूळ येथील मूर्र्तींची तोडफोड होत आहे. अखंड दगडांची झीज होऊन ते कोसळत आहेत.-महेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष, टुरिस्ट गाईड असोसिएशन
औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांचा ओघ
वर्षे पर्यटक संख्या विदेशी पर्यटक
२००६-०७१७,९१, ४६९६९,१५९
२००७-०८२२,९५,४५९७६,८१६
२००८-०९२५,१५,३४१५९,६१५
२००९-१०२९,९९,४५८८०,३७९
२०१०-११३५,१९,६५६८६,७२५
२०११-१२ ३९,३७,६४५९१,१४२
२०१२-१३४४,०९,९७८९६,९४४
२०१३-१४३९,५१,०५२७६,५१६
२०१४-१५३९,८९,७४१७७,३८५
२०१५-१६३८,५५,०७७५४,०००