शाळेच्या वेळेत जि.प.मध्ये फिराल तर...
By Admin | Updated: November 26, 2014 01:10 IST2014-11-26T00:57:43+5:302014-11-26T01:10:47+5:30
औरंगाबाद : शाळेच्या वेळेत जिल्हा परिषदेच्या परिसरात चकरा मारणाऱ्या फिरस्त्या शिक्षक नेत्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक कर्मचारी नेमा, संबंधितांवर आपण कारवाई करू

शाळेच्या वेळेत जि.प.मध्ये फिराल तर...
औरंगाबाद : शाळेच्या वेळेत जिल्हा परिषदेच्या परिसरात चकरा मारणाऱ्या फिरस्त्या शिक्षक नेत्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक कर्मचारी नेमा, संबंधितांवर आपण कारवाई करू, अशा सूचना शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी शिक्षण समितीच्या पहिल्याच बैठकीत दिल्या. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत ही सूचना मान्य केली.
दि.८ आॅगस्टनंतर तब्बल साडेतीन महिन्यांनंतर सोमवारी शिक्षक समितीची मासिक बैठक नूतन सभापती विनोद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात शिक्षक व शिक्षक संघटनेच्या नेत्यांविषयी गंभीर चर्चा झाली. शिक्षक नेते शिक्षकांचे प्रश्न घेऊन जिल्हा परिषदेत येतात; परंतु त्यांनी एकाच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सतत जिल्हा परिषदेत चकरा मारणे चुकीचे आहे. त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड सर्वच सदस्यांनी केली. त्यावर शिक्षक नेत्यांनी एक ा ठराविक दिवशी सर्व प्रश्नांनिशी जिल्हा परिषदेत यावे, त्यांच्याशी शिक्षण सभापती व जिल्हा शिक्षणाधिकारी चर्चा करून मार्ग काढतील, असे ठरले; परंतु कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांनी शाळेच्या वेळेत जिल्हा परिषदेत फिरू नये, हे पाहण्यासाठी शिक्षण विभागाचा एक कर्मचारी नेमा, अशी सूचना तांबे यांनी केली. संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जि.प. शिक्षकांना गणवेश कोड लागू करावा, अशी सूचना प्रभाकर काळे यांनी केली. या सूचनेलाही सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. शिक्षकांच्या रजा लवकर मंजूर होत नसल्याचे मधुकर वालतुरे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व शाळांतून स्वच्छता मोहीम राबविणे, कोणत्या शाळांना दुरुस्तीची गरज आहे, नवीन खोल्यांची गरज आहे, याची एकत्रित माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जमा करावी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी शाळांना नियमित भेटी द्याव्यात आदी सूचना यावेळी सभापतींनी केल्या.
बैठकीला सदस्य सुरेखा जाधव, पुषा जाधव, पुष्पा पवार, कल्पना लोखंडे, संगीता सुंब, शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, निमंत्रित सदस्य श्याम राजपूत आदींची उपस्थिती होती.