बंडखोरांवर कारवाई न झाल्यास बाहेर पडू
By Admin | Updated: March 21, 2017 23:55 IST2017-03-21T23:44:04+5:302017-03-21T23:55:51+5:30
ब्ाीड : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला कौल दिला. मात्र, काही स्वार्थी नेत्यांमुळे आम्हाला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आली नाही.

बंडखोरांवर कारवाई न झाल्यास बाहेर पडू
ब्ाीड : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला कौल दिला. मात्र, काही स्वार्थी नेत्यांमुळे आम्हाला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आली नाही. पक्षाचा व्हीप डावलणाऱ्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करणार आहोत. ही कारवाई झाली नाही तर आम्ही पक्षाच्या बाहेर पडू, असे मत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवड प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे टी. पी. मुंडे, काकू-नाना आघाडीचे संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, अशोक डक, बजरंग सोनवणे, गंगाधर घुमरे आदींची उपस्थिती होती. पत्रपरिषदेत बोलताना सोळंके म्हणाले की, सुरेश धस यांनी पक्षाचा विश्वासघात केला आहे. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिलेला असताना जिल्हा परिषद सदस्य फोडले. जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे. याचे परिणाम धस यांना भोगावे लागतील. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, सुरेश धस, अक्षय मुंदडा यांनी शरद पवार व अजित पवार यांना धोका दिला असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. सुरेश धस यांच्या सांगण्यावरून त्या सहा जि. प. सदस्यांना पक्षाने व्हीप बजावून देखील पक्षाशी त्यांनी गद्दारी केली आहे. त्यांच्यावर ९० दिवसांच्या आत नियमानुसार निलंबनाची कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर देखील या कटात सहभागी असल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री सोळंके यांनी केला, असे सांगून ते पुढे म्हणाले, पक्षाच्या व जनतेच्या विकासाला बाधा ठरत असलेले विश्वासघातकी नेते पक्षातून बाहेर पडत आहेत ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी पोषक आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (प्रतिनिधी)