पाऊस लांबल्यास उत्पादन घटण्याची शक्यता
By Admin | Updated: June 20, 2014 00:48 IST2014-06-19T23:46:02+5:302014-06-20T00:48:01+5:30
जालना: गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. परिणामी पेरणी खोळंबली आहे.

पाऊस लांबल्यास उत्पादन घटण्याची शक्यता
जालना: गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. परिणामी पेरणी खोळंबली आहे. जर पावसाला अजून वेळ झाल्यास उत्पादनात काहीअंशी घट येण्याची शक्यता जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी वर्तविली.
लांबलेला पाऊस व पेरणीची परिस्थितीबाबत घाटगे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले गतवर्षी वेळेत व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे पेरणी अगदी वेळेत पूर्ण होऊ शकली. कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. यावर्षी परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. १९ जून अखेरही जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी खरीप पेरणी ठप्प झाली आहे. जो पर्यंत चांगला पाऊस पडत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेही आपल्याकडे पावसाच्या अंदाजानुसार जून अखेर खरीप पेरण्या सुरु होतात. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येऊ शकते. जर मोठा पाऊस न पडल्यास सर्वच पिकांना याचा फटका बसू शकतो. यावर्षी ६ लाख पेक्षा जास्त हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यात सर्वात जास्त ३ लाख हेक्टवर कापसाची लागवड होईल. सोयाबीन दीड लाख त्यानंतर कमी अधिक प्रमाणात मूग, तुरीची लागवड होईल. (प्रतिनिधी)
मार्गदर्शन सुरू
शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेळावेळी मार्गदर्शन करण्यात येते. यंदाही खरीप हंगामात पेरणीपूर्व तसेच नंतरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खरिपाचे विभागाच्या वितीने नियोजन करण्यात आले आहे. काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही घाटगे यांनी केले.