मुंडेंना पायलट गाडी असती तर...
By Admin | Updated: June 5, 2014 01:09 IST2014-06-05T01:02:06+5:302014-06-05T01:09:25+5:30
औरंगाबाद : दिल्लीत वावरणार्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना कोणती सुरक्षा द्यावी हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र मंडळ आहे.
मुंडेंना पायलट गाडी असती तर...
औरंगाबाद : दिल्लीत वावरणार्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना कोणती सुरक्षा द्यावी हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र मंडळ आहे. दिल्लीत सर्वसामान्यपणे कोणत्याही मंत्र्याच्या गाडीमागे पायलटची गाडी नसते. गोपीनाथ मुंडे यांनाही नव्हती. केंद्र शासनाने राज्याप्रमाणे त्यांना पायलट गाडी सोबत दिली असती तर कदाचित दुर्घटना घडलीच नसती, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. राज्य आणि केंद्रातील गुप्तवार्ता विभागातील वेगवेगळ्या रिपोर्टनुसार राजकीय मंडळींना सुरक्षा प्रदान केली जाते. सर्वात कमी श्रेणीची सुरक्षा म्हणजे ‘एक्स’होय. त्यापेक्षा मोठी सुरक्षा म्हणजे ‘वाय’ आणि ‘झेड’असते. यातही ‘झेड’ म्हणजे त्यांना ब्लॅक कमांडोची सुरक्षा प्रदान करण्यात येते. गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात वावरताना ‘वाय’ सुरक्षा दिली असावी, असा अंदाज आहे. महाराष्टÑात मुंडे यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटकडून (एसपीओ) ‘झेड’ सुरक्षा देण्यात येत होती. राज्यात मुंडे कुठेही निघाले तर एसपीओचे अधिकारी व कर्मचारी नेहमी त्यांच्या सोबत राहत असत. ज्या ठिकाणाहून व्हीआयपी निघाले आणि ते जेथे थांबतील तेव्हापर्यंत एसपीओचे अधिकारी सोबत राहायचे. सोमवारी मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याने राज्यातील एसपीओचे अधिकारीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याला दिल्लीत पायलट गाडी कशी दिली नाही. मुंडे यांना पायलट गाडी असती तर कदाचित अशी घटना घडलीच नसती. कारण पायलट गाडी नेहमी व्हीआयपीच्या मागे असते. व्हीआयपीच्या आसपास एखादी गाडी येत असेल आणि त्या वाहनचालकाचा उद्देश चुकीचा असेल तर एसपीओची गाडी त्याला थांबविण्याचे काम करते. व्हीआयपीवर एखाद्या वाहनातून गोळीबार होत असेल तर स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या कर्मचार्यांनाही ट्रेनिंगमध्ये गोळीबार करण्याचे शिकविण्यात येते. व्हीव्हीआयपीच्या गाडीसमोर पायलटिंगची वेगळी गाडी असते. एका रांगेत या गाड्या चालत असतात. व्हीआयपीच्या गाडीजवळ एखादी दुसरी गाडी येत असेल तर त्यांना रोखण्याचे कामही इतर गाड्या करीत असतात, असे या विभागात काम केलेल्या काही आजी, माजी अधिकार्यांनी नमूद केले. दिल्लीत काही नेत्यांना तर एनएसजी कमांडोची सुरक्षा दिलेली आहे. सुरक्षेवर प्रश्नचिन्ह केंद्रीय मंत्र्यांना एक स्क्वॉड दिल्या जातो. अनेकदा मी केंद्रीय मंत्र्यांना नेण्याचे आणि आणण्याचे काम केले आहे. त्यांना देण्यात येणार्या सुरक्षा यंत्रणेत एक बंदूकधारी कर्मचारी असतो. हा कर्मचारी व्हीआयपीच्या समोरील सीटवर असतो. संकट आणि वेळप्रसंगी त्याने काय करावे यासंबंधीच्या सूचना आम्ही त्यांना ट्रेनिंगमध्ये दिलेल्या असतात. मुंडे यांच्यासोबत सुरक्षा नव्हती हे ऐकून थोडे आश्चर्य वाटते. त्यांच्या गाडीत बंदूकधारी कर्मचारी असता तर त्याने डाव्या बाजूने येणार्या वाहनाला रोखले असते. या घटनेत असे काहीच झाल्याचे दिसत नाही. महाराष्टÑातील एवढ्या मोठ्या नेत्याच्या सुरक्षेत निष्काळजीपणा का बाळगण्यात आला हे अनाकलनीय आहे. मोहंमद अब्दुल रहीम, निवृत्त पोलीस निरीक्षकराज्यात आणि केंद्रात दर सहा महिन्यांनी व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी मंडळींच्या सुरक्षेचा आढावा घेतला जातो. कोणाची सुरक्षा कमी केली जाते, तर कोणाची वाढविण्यात येते. सामान्यपणे एका सुरक्षा स्क्वॉडमध्ये १ चालक, तीन कर्मचारी नेमलेले असतात. हा स्क्वॉड व्हीआयपीच्या पाठीमागे असतो. दिल्लीतील अनेक दिग्गज नेते विमानाने सुरक्षारक्षक आणतात. यासाठी येणारा खर्चही ते खिशातून करतात.