मीटर न बसविल्यास नळ कनेक्शन तोडणार
By Admin | Updated: December 24, 2016 00:54 IST2016-12-24T00:53:27+5:302016-12-24T00:54:46+5:30
लातूर : नागरिकांनी स्वत:हून नळाला मीटर बसविण्यासाठी आता २० जानेवारी २०१७ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

मीटर न बसविल्यास नळ कनेक्शन तोडणार
लातूर : नागरिकांनी स्वत:हून नळाला मीटर बसविण्यासाठी आता २० जानेवारी २०१७ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत मनपाच्या नोंदणीकृत प्लंबरकडून मीटर बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर मनपा आपल्या मंजूर दरानुसार मीटर बसविणार आहे. त्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाईल. शिवाय, जे ग्राहक मीटर बसविणार नाहीत, त्यांचा पाणीपुरवठा बंद किंवा नळ कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
महिनाभरापूर्वी मनपाने शहरातील नागरिकांना स्वत:हून नळाला मीटर बसविण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाला सध्या तरी प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील ४७ हजार ग्राहकांपैकी केवळ साडेतीनशे ग्राहकांकडे नळाला मीटर आणि तोट्या आहेत. उर्वरित ग्राहकांकडे तोट्याही नाहीत अन् मीटरही नाही. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासनाने नळाला जलमापके बसविण्यासाठी परत आवाहन केले आहे. नोंदणीकृत प्लंबरकडून मीटर बसविण्याचे आवाहन केले आहे. २० जानेवारीनंतर ज्या ग्राहकांच्या नळाला मीटर बसविल्याचे दिसणार नाही, त्यांच्या नळांना महापालिकेच्या मंजूर निविदा दरानुसार मीटर बसविण्यात येणार आहे. त्याचा पूर्ण खर्च महापालिकेकडे भरणे संबंधित ग्राहकांना बंधनकारक राहील. अन्यथा ग्राहकांच्या नळपट्टी बिलातून सदर खर्च व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. जर खर्च दिला नाही, तर संबंधित ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल. शिवाय, नळ कनेक्शनही तोडण्यात येणार आहे. जलमापके बसविताना मीटरच्या मागील बाजूस व्हॉल्व बसविण्यात यावे तसेच मीटरच्या सुरक्षिततेसाठी फायबर / एचडीपीई प्रोटेक्शन बॉक्स (कुलूप लावण्याच्या सोयीसह) बसविण्यात यावे. नळाला पाणी येण्याची पूर्वसूचना देणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापरही ग्राहकांनी आपल्या स्तरावर करावा, असे आवाहनही महापालिका उपायुक्तांनी केले आहे.
मीटर बसविण्याबाबतचा सर्व तपशील महापालिकेने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.एमसीलातूर. ओआरजी या वेबसाईटवर प्रसिद्ध असून, तो नागरिकांना पाहता येणार आहे. (प्रतिनिधी)