छत्रपती संभाजीनगर: आगामी महापालिका निवडणूकीत आमची लढाई 'एमआयएम'सोबत आहे, ही लढाई एकत्र लढवावी लागेल. भारतीय जनता पक्षाला निर्णय घ्यायचा असेल तर तो घेऊ द्या, आम्हीही निर्णय घेऊ, असे नमूद करीत शिवसेना (शिंदेगट) पक्षाचे प्रवक्ता तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला जशास तसे उत्तर दिले.
मंत्री संजय शिरसाट हे शुक्रवारी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या सर्व वसतिगृहांना भेट देणार आहे. शहरातील वसतिगृहांच्या दुरूस्तीसाठी ५ कोटी मिळाले आहे. पुढील काही दिवसात १७ कोटी देण्यात येईल. महाविकास आघाडीतील घडामोडीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी एकमेकांच्या विरोधात काम केले. आता ते एकत्र राहणार नाही. आगामी काळात उद्धव ठाकरे एकटे दिसतील. महाविकास आघाडीत उद्धवसेनेचे महत्व संपल्याने ठाकरेंना दूर केले जात असल्याचा दावा मंत्री शिरसाट यांनी केला.
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्याने ठाकरेंचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. आम्हीही नाराज होतो. या धोरणामुळे पक्ष रसातळाला गेला आहे. नाराज नगरसेवक पर्याय शोधत आहे. आमच्याकडेही अनेक नेते येत असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीसंदर्भात भाजपने एकला चलो रे ची भूमिका घेतली. याकडे कसे पहाता, असे विचारले असता मंत्री शिरसाट म्हणाले की, त्यांनी काय भूमिका घ्यावी त्यांचा प्रश्न आहे. आमची भूमिका आहे 'एमआयएम'शी दोन हात करायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवावी लागेल, अशी आहे. भाजप निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील घेऊ, असे त्यांनी नमूद केले.
आता टाळी मारायची ठाकरेंची वेळशिंदेसेना ठाकरेंना टाळी देणार का या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री शिरसाट म्हणाले की,आमची टाळी मारायची वेळ गेली आहे. आता त्यांची वेळ आहे. आम्ही कशासाठी चर्चा करायची? त्यांना जाणीव होऊ द्या, त्यांनी टाळी देऊ द्या, आम्ही विचार करू, त्यांच्या सरड्या सारख्या बदलत्या भूमिका महाराष्ट्र पाहत आहे.