भाजपला मताधिक्य तर सेना, राष्ट्रवादीचा अंदाज चुकला
By Admin | Updated: October 22, 2014 01:17 IST2014-10-22T00:47:35+5:302014-10-22T01:17:22+5:30
फकिरा देशमुख ,भोकरदन भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुथ व गाव निहाय आकडेवारीत भाजपाने भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सुद्धा पहिल्या क्रमाकांची मते

भाजपला मताधिक्य तर सेना, राष्ट्रवादीचा अंदाज चुकला
फकिरा देशमुख ,भोकरदन
भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुथ व गाव निहाय आकडेवारीत भाजपाने भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सुद्धा पहिल्या क्रमाकांची मते घेऊन विजय संपादन केल्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचे विजयाचे गणित हुकले आहे.विशेष म्हणजे केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे डावपेच यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
भोकरदन विधानसभा मतदार संघात यावेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवित आपली ताकद आजमविण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला पंचरंगी वाटत असलेली निवडणूक मतदारांनी चक्क तिरंगी केली. कारण मते देऊन वाया घालविण्यापेक्षा स्पर्धेतील उमेदवाराला मत देण्याचा निर्णय मतदारांनी घेतल्याचे दिसते. या मतदार संघात भाजपाचे संतोष दानवे, राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे, मनसेचे दिलीप वाघ हे तीन पक्षांचे उमेदवार भोकरदन तालुक्यातील तर शिवसेनेचे रमेश गव्हाड, काँग्रेसचे सुरेश गवळी, बसपाचे गौतम म्हस्के हे तीन पक्षांचे उमेदवार हे जाफराबाद तालुक्यातील होते. या निवडणुकीत पहिल्यांदाच जाफराबाद तालुक्याला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याचा आनंद झाला होता. या मुद्यावर तालुका एक करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. मात्र याला रमेश गव्हाड व सुरेश गवळी यांना यश आले नाही. कारण जाफराबाद तालुक्यातून सुध्दा भाजपाचे संतोष दानवे यांना या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्तीची मते मिळाली. निवडणुकीच्या काळात तालुुक्यातील उमेदवार म्हणून रमेश गव्हाड यांना जाफराबाद तालुक्यात २३ हजार ३३५ मते मिळाली. संतोष दानवे यांना २८ हजार ९० मते मिळाली तर चंद्रकांत दानवे यांना या तालुक्यात २० हजार २७५ ही तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. भोकरदन तालुक्यात मात्र संतोष दानवे यांनी तब्बल ४४ हजार ९३५ मते घेऊन पहिला क्रमांक मिळविला. त्या पाठोपाठ चंद्रकांत दानवे यांना ३९ हजार ३५५ मते मिळाली. रमेश गव्हाड यांना या तालुक्यात केवळ १२ हजार ६०४ मते घेता आली. त्यामुळे रमेश गव्हाड हे स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
या उमदेवारांमध्ये पोस्टल मतांमध्ये सुध्दा संतोष दानवे यांना १५३ तर चंद्रकांत दानवे यांना ८७ तर रमेश गव्हाड यांना ७० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या गड असलेल्या मुस्ल्मि बहुसंख्य असलेल्या कठोरा बाजार या गावात भाजपाने आतापर्यंत पहिल्यांदाच मताधिक्य मिळविले आहे. भोकरदन व जाफराबादमध्ये राष्ट्रवादीला आघाडी असली तरी ती आतापर्यंतच्या निवडणुकीच्या तुलनेत अत्यल्प होती. कारण या ठिकाणी शफीकखॉ पठाण यांच्या रिक्षाने ही मते घेतली होती. रिक्षाला ४ हजार ७६२ मते मिळाली तर जाफराबाद तालुक्यात बसपाच्या गौतम म्हस्के यांच्या हत्तीने ४ हजार ६१७ मते घेऊन घड्याळावर पाय देण्याचे काम केले आहे. तर काँग्रेसला पहिल्यांदाच नामुष्की होईल एवढे मतदान झाल्याने काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी कटल्यामुळे लक्ष्मणराव दळवी यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र त्याना केवळ २ हजार ५८७ मते मिळाली.
त्यामुळे त्यांना मतदारांनी साथ दिली नाही. तर मनसेचे उमेदवार भोकरदन तालुक्यातील असले तरी ते व्यवसायाने सुपा जि़ नगर येथे वास्तव्यास असल्याने या वेळी त्यांना मतदारांनी झिडकारले.
शिवाय त्याचे सुध्दा अनेक मोहरे हे भाजपाच्या गळाला लागल्याने रेल्वेइंजिन बंद पडले होते.
मनसेला ३ हजार १६३ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या वेळी तिसऱ्या फेरीत चंद्रकांत दानवे यांना २११ मते शिल्लकीची तर पंधराव्या फेरीत ६४ मते शिल्लकची पडली होती. उर्वरित २० फेऱ्यांमध्ये संतोष दानवे यांनी प्रत्येक फेरीत मतांची आघाडी घेऊन विजयात रुपांतर केले़
या निवडणुकीत संतोष दानवे हे निवडून आले असले तरी यावेळी केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांनी दिलेली साथ तसेच काही विरोधी पक्षांतील मोहऱ्यांना आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आल्यामुळे या मतदारसंघात भाजपाची सत्ता येण्यास मदत झाली आहे़ परिणामी स्वत:च्या चिरंजीवाला निवडणुकीत यश मिळवून देता आले.